Pune Rain News | पुण्यात यंदा 736 मिमी पावसाची नोंद; सरासरीपेक्षा 91 मिमी अधिक पाऊस

rain

पुणे : Pune Rain News |  एल निनोच्या प्रभावामुळे यंदाचा मान्सून कमी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवरही पुणे शहरात सलग तिसऱ्या वर्षी पावसाळी हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत शिवाजीनगर वेधशाळेत एकूण 736 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चार महिन्यांच्या सरासरीच्या तुलनेत यंदा 91 मिलिमीटर अधिक पाऊस पडला.

भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार, 1 जून ते 30 सप्टेंबर हा कालावधी मान्सून हंगाम मानला जातो. पुण्यात या कालावधीतील सरासरी पाऊस सुमारे 645 मिलिमीटर आहे.

यंदा जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला. मात्र, जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावत संपूर्ण परिस्थिती बदलली. शहरासह घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक धरणे महिनाभरातच पूर्ण क्षमतेने भरली.

जुलैमध्ये सरासरीच्या दुपटीहून अधिक पाऊस नोंदवला गेला. त्यामुळे जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तुलनेने कमी पाऊस पडूनही संपूर्ण हंगामातील पावसाने सरासरी ओलांडली.

ऑगस्टमध्ये वातावरणातील प्रतिकूल घडामोडींमुळे पावसाने मोठी विश्रांती घेतली. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही दिवस चांगला पाऊस झाला, तरी मासिक सरासरी गाठता आली नाही. सप्टेंबरमध्येही मोजक्याच दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आणि महिन्याचा पाऊस 100 मिलिमीटरपर्यंतही पोहोचला नाही.

हलक्या सरींपासून मुसळधार पावसापर्यंत पुणेकरांचा अनुभव

अरबी समुद्र आणि कोकण किनारपट्टीवर वेळोवेळी तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुणे परिसरात विविध स्वरूपाचा पाऊस अनुभवायला मिळाला. हवामान विभागाने अनेकदा ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केल्याने प्रशासकीय यंत्रणांनाही सतर्क राहावे लागले.

जुलै आणि ऑगस्टमध्ये पुणेकरांनी हलक्या सरी, संततधार, मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि मुसळधार पाऊस अनुभवला. चिंचवडमध्ये सप्टेंबर महिन्यात अवघ्या दोन तासांत 100 मिलिमीटर पाऊस नोंदवला गेल्याची नोंद आहे.

मुळशी, ताम्हिणी, लोणावळा आणि जुन्नरच्या काही भागांत अतिवृष्टी, ढगफुटीसदृश पाऊस आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. दुसरीकडे बारामती, पुरंदर आणि सासवड परिसरात तुलनेने कमी पाऊस नोंदवला गेला.

एकूणच यंदाच्या पावसाळ्यात पुणे शहर आणि धरण क्षेत्राला चांगला पाऊस मिळाला आणि धरणे भरली; मात्र अनेक ग्रामीण भागांतील अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.

You may have missed