Pune Crime News | रांजणगाव येथील रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडे सापडली 4 गावठी पिस्तुले, 12 काडतुसे, 3 मॅगझीन

Pune Rural Police

पुणे : Pune Crime News | रांजणगाव परिसरातील सोनेसांगवी गावातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडील ग्रामीण पोलिसांनी तब्बल ४ गावठी पिस्तुले, ३ मॅगझीनसह १२ काडतुसे असा १ लाख ८२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. (Pune Rural Police)

सुरज राजेश पाडळे (वय २७, रा. सोनसांगवी, ता. शिरुर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. सुरज पाडळे, संकेत संतोष महामुनी (रा. सरदवाडी) व इतर दोघे असे चौघांनी मध्य प्रदेशात जाऊन प्रत्येकी एक या प्रमाणे चार गावठी पिस्तुले विकत घेतली. त्यासोबत जिवंत काडतूस व अधिकचे मॅगझीन आणले होते. इतर तिघांनी ती पिस्तुले सुरज पाडळे याच्याकडे ठेवायला दिली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांवर २६ मार्च रोजी कारवाई करत होते. त्यावेळी या पथकाला रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरज पाडळे याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनसांगवी गावात जाऊन सुरज पाडळे याला पकडले. त्याच्याकडील एक व इतर तिघांनी ठेवायला दिलेली ३ अशी चार गावठी पिस्तुले, १२ जिवंत काडतुसे, ३ मॅगझीन असा १ लाख ८२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

सुरज पाडळे व संकेत महामुनी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी शरीराविरुद्धचे व आर्म अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
नव्या वर्षात स्थानिक गुन्हे शाखेने ७ पिस्तुले व १७ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहे़ विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी हे सध्या पुणे जिल्ह्याच्या वार्षिक तपासणीसाठी पुण्यात आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करुन मोठ्या प्रमाणावर पिस्तुले हस्तगत केल्याने त्यांनी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक केले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, अमोल शेडगे यांनी केली आहे.

You may have missed