Pune Crime News | कोरेगाव पार्कमधील हॉटेल प्लंज च्या मालकासह 6 जणांवर गुन्हा दाखल; पहाटे 4 पर्यंत मद्य विक्री करुन लाऊड स्पीकर चालू ठेवून सुरु होता धिंगाणा
पुणे : Pune Crime News | परवानगीपेक्षा अधिक काळ पहाटे ४ वाजेपर्यंत मद्य विक्री करुन लाऊड स्पीकर चालू ठेवून लोकांना त्रास देणार्या कोरेगाव पार्कमधील हॉटेल प्लंज व त्याच्या मालकांसह ६ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Plunge, Koregaon Park, Pune)
जितेश मेहता (Hotel Plunge Owner Jitesh Mehta) , सुनिल पवार, विराज, शुभम आचारी, राहुलसिंग, डी जे ओमकार, डी जे श्रेयश अशा ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पबचे जितेश मेहता हे मालक असून सुनिल पवार मॅनेजर आहे. अन्य आरोपी डी जे चालक व त्यांचे कर्मचारी आहेत. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Hotel Plunge)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क येथील ज्वेलर टॉवर येथील ३ मजल्यावर हॉटेल प्लंज हा पब व बार आहे. शासकीय नियमानुसार मध्यरात्री दीड वाजेपर्यंत मद्य विक्री करण्यास परवानगी आहे. असे असताना हॉटेल प्लंज येथे पहाटे ४ वाजेपर्यंत मद्य विक्री केली जात होती. मोठमोठ्याने लाऊड स्पीकर लावून नागरिकांना त्रास दिला जात होता. १ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत हा धिंगाणा सुरु होता. परिसरातील नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन माहिती दिली. त्याबरोबर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हॉटेल प्लंज येथे पोहचले. तेव्हा तेथे लाऊड स्पीकर सुरु होता. काही जण मद्यपान करत होते. पोलिसांनी तेथील लाऊड स्पीकर तसेच काऊंटरवरील बिलिंग विभागातील सामुग्री जप्त केली असून मालकासह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड तपास करीत आहेत.
