Loni Kalbhor Pune Crime News | धक्कादायक ! ‘टेस्ट ट्युब बेबी’तून झालेल्या जुळ्या मुलांची वाढ न झाल्याने आईने 2 महिन्यांच्या मुलांना प्लास्टिकच्या टाकीतील पाण्यात बुडवून जीवे मारले

पुणे : Loni Kalbhor Pune Crime News | कोथरुडमधील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील प्रकरण गाजत असतानाच टेस्ट ट्युब बेबी करीता मोठ्या प्रमाणावर खर्च करुन दोन जुळी मुले झाली. परंतु त्यांची वाढ योग्य रित्या न झाल्याने आईने आपल्या दोन महिन्यांच्या जुळ्या मुलांना छतावरील प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीतील पाण्यात बुडवून जीवे मारले व स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ही घटना थेऊरमधील दत्तनगर भागातील काकडे वस्तीत मंगळवारी सकाळी पावणे सात वाजता घडली. याप्रकरणी या महिलेच्या भावाने लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी या ३५ वर्षाच्या महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचा एका प्राथमिक शिक्षकाची विवाह झाला आहे. ती मुळची सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील मिरजवाडी येथे राहणारी आहे. विवाहानंतर १० वर्षानंतरही त्यांना मुल होत नसल्याने त्यांनी मोठा खर्च करुन टेस्ट ट्युब बेबीचा पर्याय निवडला. त्या माहेरी दत्तनगरला आल्या होत्या. टेस्ट ट्युब बेबीच्या माध्यमातून त्यांना दोन महिन्यांपूर्वी दोन जुळे मुले झाली. परंतु, त्यांची वाढ योग्यरित्या होत नव्हती. या बाळंतपणात महिलाही खूप अशक्त झाली असून त्यांना काही आजार झाला आहे. मुलांची योग्य वाढ होत नसल्याने व त्याचा खर्च परवडत नसल्याने त्या तणावात होत्या. त्यातून त्या मंगळवारी सकाळी दोन्ही बाळांना घेऊन घराच्या छतावर गेल्या. त्यांनी छतावरील प्लास्टिकचे पाण्याचे टाकीमध्ये पाण्यात दोन्ही बाळांना बुडविले व स्वत: त्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार शेजारील राहणार्यांनी पाहून पोलीस नियंत्रण कक्षाला कळविला. पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन महिलेला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत दोन्ही बाळांचा मृत्यु झाला होता. पोलिसांनी या महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार तपास करीत आहेत.