Anjali Damania | धनंजय मुंडेंच्या जवळच्या व्यक्तीच्या पत्नीचे निधन; अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Anjali Damania | बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे धनंजय मुंडे सध्या वादाच्या कचाट्यात सापडले आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर आरोप केले आहेत.
धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राज घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचे सोमवारी (२१ एप्रिल) निधन झाले. यावरून दमानिया यांनी खळबळजनक आरोप केला आहे. मनाली घनवट यांनी आत्महत्या केली असून, त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा भासवण्याचा प्रयत्न होत आहे, असे मयताच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे, असा दावा दमानिया यांनी केला.
अंजली दमानियांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट केले आहे की, ‘खूप खूप धक्कादायक! राज घनवट हे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत. त्यांच्या पत्नीच्या आकस्मित मृत्यू झाला आहे. पण कारण स्पष्ट नाही. पुण्यातल्या ज्यूपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. राज घनवट धनंजय मुंडे त्यांच्या विविध कंपन्यामध्ये डायरेक्टर आहेत. ह्याच राज घनवटने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत. त्या संबंधित जमिनीच्या चौकशीची मागणी, मी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे,’ असा आरोप दमानिया यांनी केला.