Pune Ganeshotsav | पुणे : चार बेस अन् चार टॉपला परवानगीची तयारी; 80 टक्के मंडळे पर्यायास अनुकूल, गणेश मंडळांपुढे पोलिसांची शरणागती ?
पुणे : Pune Ganeshotsav | गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये ध्वनियंत्रणेसाठी दोन बेस आणि दोन टॉपऐवजी चार बेस आणि चार टॉप वापरण्याच्या पर्यायावर पोलिसांकडून सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या पर्यायाला शहरातील सुमारे 80 टक्के गणेश मंडळांनी अनुकूल प्रतिसाद दिल्याचेही सांगण्यात येत आहे.
गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर ध्वनियंत्रणेच्या वापराबाबत पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांच्या प्रतिनिधींमध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे. मतभेद चर्चेतून सोडवण्याचा प्रयत्न होत असून, ध्वनियंत्रणेची क्षमता, रचना आणि वापर याबाबत विविध पर्यायांचा विचार केला जात आहे.
अतितीव्र आवाजाला मोकळीक नाही
नागरिकांना होणारा त्रास आणि वाढते ध्वनिप्रदूषण लक्षात घेता अतितीव्र आवाज करणाऱ्या उपकरणांना कोणतीही मोकळीक दिली जाणार नसल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी प्लाझ्मा आणि प्रेशर मीड यांसारख्या उपकरणांवरील बंदी कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
ईद-ए-मिलाद मिरवणुकीतही कारवाई
ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान चार टॉप आणि चार बेसपेक्षा अधिक साउंड सिस्टीम वापरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. प्लाझ्मा आणि प्रेशर मीडचा वापर केल्याप्रकरणी सहा साउंड सिस्टीम जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
तसेच, आवाजाची निर्धारित मर्यादा ओलांडल्याप्रकरणी 110 हून अधिक प्रकरणांमध्ये पोलिसांनी खटले दाखल केले असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
चार बेस-चार टॉपच्या पर्यायामुळे मंडळांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी ध्वनीमर्यादा आणि प्रतिबंधित उपकरणांबाबत पोलिसांची भूमिका कठोरच राहणार असल्याचे चित्र आहे.
