Ghatanji Yavatmal ACB Trap Case | अवधुतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांना 1 लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

Ghatanji Yavatmal ACB Trap Case | Police Inspector Naresh Randhir of Avadhutwadi Police Station was caught red-handed by the Anti-Corruption Bureau while accepting a bribe of Rs. 1 lakh.

घाटंजी :   Ghatanji Yavatmal ACB Trap Case |  यवतमाळ येथील अवधुतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक नरेश रमेशराव रणधीर Naresh Rameshrao Randhir (ह.मु. यवतमाळ, रा. अंमळनेर जिल्हा जळगांव) यांना अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ लाख रुपयाची लाच घेतांना सापळा यशस्वी करुन रंगेहाथ पकडले.

पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी यातील तक्रारदार यांनी तक्रार दिली की, त्यांचे एका मित्राला पैश्याची गरज असल्याने त्यांनी मध्यस्थी करून त्याने दुसऱ्या मित्रांकडून १०,००,०००/- रुपये (दहा लाख रुपये) घेवून ६ महिन्याकरीता त्यांना दिले. परंतु ज्या मित्राला पैसे दिले त्याने सहा महिने पुर्ण होवूनही घेतलेले पैसे अद्यापपावेतो परत दिलेले नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी ज्या मित्राला पैसे दिले तो परत करत नसल्याबाबतची तक्रार अवधुतवाडी पोलीस स्टेशन, यवतमाळ येथे दिली असता, नरेश रणधीर, पोलीस निरीक्षक अवधुतवाडी पोलीस स्टेशन, यवतमाळ यांनी तक्रारदार यांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याचे मोबदल्यात ५,००,०००/- रुपये (पांच लाख रुपये) लाचेची मागणी केल्याबाबतची लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती येथे दाखल केली.

सदर तक्रारीचे अनुषंगाने, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे ३,००,००० रुपये (तीन लाख रुपये) लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर आयोजित सापळा कारवाई दरम्यान आलोसे नरेश रणधीर, पोलीस निरीक्षक यांनी तक्रारदार यांचेकडून मागणी केलेल्या लाच रक्कमेच्या पैकी १,००,०००/- रुपये (एक लाख रुपये) लाच स्विकारले. या वरुन आलोसे नरेश रणधीर, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अवधुतवाडी, यवतमाळ यांना ताब्यात घेण्यात आले असुन, त्यांचे विरुध्द अवधुतवाडी पोलीस स्टेशन यवतमाळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अमरावती परिक्षेत्र अमरावतीचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक संचिद्र शिंदे, पोलीस उप अधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, पोलीस निरीक्षक स्वप्नील निराळे, पोलीस शिपाई शैलेश कडू, उपेंद्र थोरात, वैभव जायले, चालक सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सतीश किटूकले, चालक पोलीस काॅन्स्टेबल राजेश बहीरट आदींनी यशस्वी रीत्या पार पाडली.

दरम्यान, अवधुतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक नरेश रमेशराव रणधीर यांच्या घराची झडती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

You may have missed