Pune ACB Trap Case | निवासी नायब तहसीलदाराला लाच घेताना ACB ने केली अटक

Pune ACB Trap Case

जेव्हा मंडल अधिकार्‍याला पगार मिळविण्यासाठी द्यावी लागते लाच, तहसीलदार म्हणतात, ‘मंडल अधिकार्‍याला कशाला लागतो पगार’

पुणे : Pune ACB Trap Case | तलाठी म्हणून काम करत असताना त्यांना एप्रिल २०२५ पासून पदोन्नतीने मंडल अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. परंतु, तेव्हापासून त्याचा पगार काढला जात नव्हता. हा पगार काढण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच मागून ४० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नायब तहसीलदार याला सापळा रचून रंगेहाथ पकडले.

चंद्रकांत काशिनाथ हेडगिरे Chandrakant Kashinath Hedgire (वय ५२, रा. शिवरत्ननगर, जुळे सोलापूर) असे अटक केलेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे. उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात कार्यरत आहेत. याच तहसील कार्यालयाचे तहसीलदार म्हणतात, ‘मडंल अधिकार्‍याला कशाला लागतो पगार’ तक्रारदार हे उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या हद्दीत मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची एप्रिल २०२५ मध्ये तलाठी ते मंडल अधिकारी अशी पदोन्नती झाली. त्यांना उत्तर सोलापूरातील सोरेगाव मंडळ येथे मंडलाधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. त्यांना पदोन्नती झाली तरी एप्रिल २०२५ पासून पगार मिळाला नाही. त्यांनी उत्तर सोलापूरचे तहसीलदार यांना विनंती केली. त्यांनी ही बाब गांभीर्यपूर्वक न घेता आपली जबाबदारी टाळून दिली. 

त्यानंतर तक्रारदार हे तेथील निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांना भेटले. हेडगिरे याने तक्रारदार यांना लवकारात लवकर पगार पत्रक तयार करुन साहेबांना सांगून पगार करुन देतो, त्यासाठी ४० हजार रुपये द्यावे लागतील़ असे सांगून तक्रारदार यांच्याकडे लाच मागितली. त्यांनी ५ डिसेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची १५ डिसेंबर रोजी पडताळणी केली. त्यात निवासी नायब तहसीलदार हेडगिरे याने ८ महिन्यांचा थकीत पगार मिळविण्यासाठीची प्रक्रिया राबवुन बील पुढे पाठविले आहे, असे सांगून ६० हजार रुपयांची लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ४० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर उत्तर सोलापूरच्या तहसीलदार यांच्याकडे तक्रारदार गेले होते.

त्यांनी पगार काढण्याबाबत विनंती केली़ तेव्हा तहसीलदार म्हणाले, ‘‘मंडल अधिकारी यांना पगार कशाला लागतो़’’ परंतु, त्यांनी लाचेबाबत काही न म्हटल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात सापळा लावला. तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे याला सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर व त्याचे सहकारी यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक शैलेश पवार अधिक तपास करीत आहेत.

You may have missed