Pune Crime News | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केली 706 सराईतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई

Pune Police

पुणे : Pune Crime News | महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ दोनच्या हद्दीतील ७०६ सराईतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी शनिवारी दिले.

पुणे पोलीस दलाच्या  परिमंडळ दोनमध्ये स्वारगेट, सहकारनगर, पर्वती, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, आंबेगाव, भारती विद्यापीठ या पोलीस ठाण्यांच्या समावेश होतो. महापालिका निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच सराईतांना जरब बसविण्यासाठी खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारहाण, शिवीगाळ करणे, दहशत माजविणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ७०६ सराईतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक पार पडेपर्यंत सराईतांना परिमंडळ दोनच्या हद्दीत येण्यास मनाई करण्यात आली आहे, असे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी सांगितले.

कारवाई करण्यात आलेल्या सराईतांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यात आला आहे. मात्र, परिमंडळ दोनच्या हद्दीतील सार्वजनिक कार्यक्रमात वावरणे, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा प्रकारचे वर्तन करण्यास मनाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.