Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्र. 03 मधील भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमेदवार ऐश्वर्या पठारे, डॉ. श्रेयस खांदवे, अनिल सातव व रामदास दाभाडे यांच्याकडून महिलांसाठी विशेष जाहीरनामा

Pune PMC Elections | Pune: BJP-RPI alliance candidates in Ward No. 03 Aishwarya Pathare, Dr. Shreyas Khandve, Anil Satav and Ramdas Dabhade release special manifesto for women

पुणे : Pune PMC Elections | महानगरपालिकेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून सर्वच प्रभागांमध्ये प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपा-आरपीआय महायुतीचे उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, डॉ. श्रेयस प्रितम खांदवे, अनिल दिलीप सातव आणि रामदास दत्तात्रय दाभाडे यांनी महिलांसाठी खास जाहीरनामा सादर करून प्रचारात वेगळेपण जपले आहे.

हा जाहीरनामा महिला आरोग्य, महिला सुरक्षितता, महिला कौशल्य विकास आणि महिला आर्थिक सक्षमीकरण या चार प्रमुख स्तंभांवर आधारित आहे. विशेषतः लोहगाव आणि वाघोली परिसरातील महिलांच्या गरजा लक्षात घेऊन या जाहीरनाम्याची आखणी करण्यात आली आहे. निवडून आल्यानंतर या चारही विषयांवर प्राधान्याने काम केले जाईल, असा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे.

घरोघरी जाऊन जाहीरनाम्याची अंमलबजावणी

फक्त जाहीरनामा प्रसिद्ध करून थांबायचे नाही, तर वाघोली व लोहगाव परिसरातील घरोघरी जाऊन योजनांची अंमलबजावणी केली जाईल, असे उमेदवारांनी स्पष्ट केले. महिलांच्या आरोग्यासाठी मूलभूत सुविधा, सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना, कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण तसेच आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

प्रचारात भाजपची आघाडी

प्रभाग क्रमांक ३ मध्ये सुरुवातीपासूनच भाजपने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. उच्चशिक्षित व आयटी क्षेत्रातील अनुभव असलेल्या ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी आपल्या वेगळ्या कार्यशैलीमुळे प्रचारात ठसा उमटवला आहे. त्यांनी “नगरसेवक म्हणून नव्हे, तर प्रभागाची प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करणार” अशी भूमिका मांडली आहे.

‘100 दिवस 100 कामे’ संकल्पनेचा वापर

प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘100 दिवस 100 कामे’ या उपक्रमाचा संदर्भ देत, निवडून आल्यानंतर 100 दिवसांत 100 कामे पूर्ण करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला आहे. कोणत्या कामांना प्राधान्य दिले जाईल, याचाही सविस्तर आराखडा मतदारांसमोर मांडण्यात आला आहे.

पूर्व पुण्यातील विकास आणि महिलांचे सक्षमीकरण

येरवडा, वाघोली, लोहगाव, चंदननगर आणि खराडी असा पूर्व पुण्याचा परिसर झपाट्याने विकसित होत आहे. या विकास प्रक्रियेत महिलांचा सक्रिय सहभाग वाढवणे आणि त्यांना सक्षम करणे, हाच या महिला जाहीरनाम्याचा मुख्य उद्देश आहे.

आता निर्णय मतदारांच्या हातात

महिलांवर केंद्रित या विशेष जाहीरनाम्यामुळे प्रभाग क्रमांक ३ मधील निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे. सुशिक्षित व आधुनिक विचारसरणीच्या उमेदवारांच्या पाठीशी मतदार उभे राहतात का, आणि त्यांना पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवतात का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

राजमाता जिजाऊ संकल्पनामा

महिला आरोग्य

दरवर्षी महिलांसाठी मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी (Full Body Checkup)

स्तन व गर्भाशय कर्करोगाबाबत नियमित जनजागृती व तपासणी शिबिरे

प्रतिबंधात्मक तपासणी व उपचारांवर केंद्रित उपक्रम

महिला सुरक्षा

संत जनाई बस सुविधा (दर १० मिनिटांनी)

सर्व गल्ल्या व अंधाऱ्या ठिकाणी कार्यरत पथदिवे

२४×७ महिला आपत्कालीन हेल्पलाईन

२४×७ तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्स सेवा

महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित व अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहे

महिला कौशल्य विकास

संत मुक्ताई नॉलेज सेंटर अंतर्गत

महिला गृहउद्योगासाठी कौशल्य विकास व मार्गदर्शन

इंग्लिश स्पीकिंग व कम्युनिकेशन कोर्स

पदवीधर महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन व कन्सल्टिंग

महिलांसाठी एआय प्रशिक्षण कार्यक्रम

सुरक्षित व महिला-केंद्रित को-वर्किंग स्पेस

महिला आर्थिक सक्षमीकरण

१० महिला क्रीडापटूंना विशेष शिष्यवृत्ती

१० नाविन्यपूर्ण महिला गृहउद्योगांना आर्थिक सहाय्य

१० वी–१२ वी नंतर विद्यार्थिनींसाठी करिअर मार्गदर्शनासह शिष्यवृत्ती

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुली व महिलांसाठी शैक्षणिक आर्थिक मदत