Pune Crime News | घरफोडी करणार्‍या सराईत गुन्हेगाराला केले जेरबंद ! समर्थ पोलिसांनी 126 सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हेगाराला केले निष्पन्न

Pune Crime News | House burglar arrested by Samarth police identified the culprit by examining 126 CCTV footage

पुणे : Pune Crime News |  घरात शिरुन बेडरुमच्या टेबलवर ठेवलेले ९० हजार रुपयांचे मिनी गंठण चोरुन नेणार्‍या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी १२६ सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेऊन जेरबंद केले.

सोहेल समीर शेख Sohail Sameer Shaikh (वय २६, रा. न्यू नाना पेठ, पत्रा चाळ) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. सोहेल शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर २०२२ मध्ये चोरीचे २ गुन्हे दाखल आहेत.

याबाबत वनिता श्रीनिवास अंदे (वय ४६, रा. भवानी पेठ, कामगार मैदान) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा घरफोडीचा प्रकार ८ जानेवारी रोजी पहाटे साडेपाच ते सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बेडरुममध्ये झोपलेल्या असताना चोरट्याने घरात प्रवेश केला. बेडरुमचा दरवाजा कशाच्या तरी सहाय्याने उघडला. टेबलावर ठेवलेले ९० हजार रुपयांचे मिनी गंठण चोरुन नेले होते.

घरफोडीची माहिती मिळाल्यावर समर्थ पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात शितळादेवी मंदिराबाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दिसून आला. त्याचा पुढे जवळपास १२६ सीसीटीव्ही फुटेजद्वारे मागोवा घेतला. त्यातून हा गुन्हा सोहेल शेख याने केल्याचे निष्पन्न झाले. त्याचा शोध घेतला असता तो पुण्याबाहेर पळून बाहेर गेल्याचे समजले. दरम्यान तो पुण्यात आल्याचे तपास पथकाला समजले. त्यानुसार पोलिसांनी त्याला २० जानेवारी रोजी अटक केली. त्याच्याकडून चोरलेले ९० हजार रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण जप्त केले आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक चेतन मोरे, सहायक पोलीस निरीक्षक धीरज राऊत, पोलीस अंमलदार संतोष पागार, रवींद्र औचरे, रोहीदास चाघेरे, शिवा कांबळे व अमोल गावडे यांनी केली आहे.

You may have missed