Ajit Pawar | 9 हजार पोलिसांच्या मदतीने ग्रामीण पोलिसांचा यशस्वी बंदोबस्त; उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाखोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप

Ajit Pawar | Successful deployment of rural police with the help of 9 thousand policemen; Last farewell to Deputy Chief Minister Ajit Pawar in the presence of lakhs

पुणे : Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार गुरुवारी करण्यात येणार होते. या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून विविध राज्यातील मंत्री, महाराष्ट्राचे जवळपास सर्व मंत्रिमंडळ त्याचबरोबर आमदार, खासदार आणि लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याने पुणे ग्रामीण पोलीस दलावर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी येऊन पडली होती. पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासह होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दल यांच्यासह अन्य पोलीस दलांतील ९ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या मदतीने ग्रामीण पोलिसांनी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. २४ तासांच्या आत महाराष्ट्र पोलिसांनी समन्वयातून हा प्रचंड मोठा बंदोबस्त पार पाडला.

पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विनयकुमार चौबे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी जातीने या संपूर्ण बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याचे समजल्यानंतर संपूर्ण राज्यातून त्यांचे चाहते, समर्थक मोठ्या संख्येने बारामतीकडे येऊ लागले होते. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वच पोलीस सज्ज झाले. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी स्वत: संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

बारामतीमध्ये येणारे लाखो समर्थक, चाहते तसेच असंख्य मान्यवर यांची येणारी वाहने, त्यांना विद्या प्रतिष्ठान येथील अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता मोकळा ठेवणे़ त्याचवेळी सर्वसामान्यांना तेथे जाण्यासाठी कोणताही त्रास होऊ नये, अशी सर्व व्यवस्था करण्याची मोठी जबाबदारी होती. त्याचवेळी हा दु:खद प्रसंग असल्याने येणार्‍या लोकांना नेहमीचा पोलीसी खाक्या न दाखवता संपूर्ण गर्दीचे व्यवस्थापन करण्याची मोठी जबाबदारी होती.

यासाठी पुणे शहर पोलीस दलातील पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, अंमलदार असा सुमारे ८०० जणांचा बंदोबस्त नेमण्यात आला होता.

पिंपरी चिंचवड पोलीस दलातील पोलीस आयुक्त, २ पोलीस उपायुक्त, २ सहायक पोलीस आयुक्त, १० पोलीस निरीक्षक, २३ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व अंमलदार असा ४५० जणांचा फौजफाटा नेमण्यात आला होता.

याशिवाय ठाणे, नवी मुंबई, सातारा, कोल्हापूर, सांगली येथील पोलीस फौजफाटा बंदोबस्ताला मागविण्यात आला होता.

याशिवाय बारामतीकडे येणारे जाणारे सर्व रस्त्यांवर कोठेही वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी लगतच्या सर्व जिल्ह्यांमधील महामार्गावर वाहतूक विभागाचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  अनेक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार हे गेल्या २४ तासांपासून रात्रभर या संपूर्ण बंदोबस्ताची आखणी करीत होते. गुरुवारी दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर जड अंतकरणाने त्यांचे चाहते परतू लागले. त्यानंतरच या पोलिसांनी नि:श्वास सोडला. अशा प्रसंगी इतका मोठा बंदोबस्त करण्याचे नियोजन ग्रामीण पोलीस दलाने यशस्वी केले.

You may have missed