Pune Crime News | वेद फुड चितळे बंधु येथे घरफोडी करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद ! आंबेगाव पोलिसांनी तीन गुन्हे आणले उघडकीस
पुणे : Pune Crime News | दत्तनगरमधील वेद फुड चितळे बंधु या दुकानाचे शटर उचकटून घरफोडी करणार्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना आंबेगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
ओमकार मारुती देडे (वय २१, रा. किरकटवाडी, धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या साथीदार अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ओमकार देडे याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात शरीराविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.
याबाबत हर्षल महेंद्र शहा (वय ३८, रा. लेकव्हिस्टा, जांभुळवाडी रोड) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. शहा यांचे दत्तनगर येथील विंडसर काऊंटी येथे वेद फुड चितळे बंधु हे दुकान आहे. दुकान बंद असताना २५ व २६ जानेवारी २०२६ च्या रात्री चोरट्यांनी दुकानाचे डाव्या बाजूचे शटर उचकटून तसेच काच फोडून आत प्रवेश केला. दुकानामध्ये असलेली २६ हजार २५० रुपयांची रोकड चोरुन नेली होती.
गुन्ह्याचा तपास करीत असताना घटनास्थळाचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीचे आधारे पोलिसांनी ओमकार देडे व त्याचा साथीदार अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात आंबेगावमधील दोन आणि विमानतळ परिसरातील एक असे तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपीकडून ऑटो रिक्षा, मोटारसायकल व रोख रक्कम असा १ लाख २४ हजार ६०० रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर तपास करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शैलेश साठे, चेतन गोरे, हणंमत मासाळ, निलेश जमदाडे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, हरिश गायकवाड, राकेश टेकवडे, शिवाजी पाटोळे यांनी केली आहे.
