Pune Crime News | दुप्पट भाडे मागितल्याचे कारण विचारल्यावर महिलेशी अश्लिल वर्तन करुन उबेर कॅबचालकाने केला विनयभंग; बाणेरमधील रोडवरील भरदिवसाची घटना
पुणे : Pune Crime News | अॅपवरुन कॅब मागविल्यावर त्याला ओटीपी दिल्यानंतर त्याने दुप्पट भाडे मागितले. दुप्पट भाडे कशासाठी अशी विचारणा केल्यावर उबेर कॅबचालकाने महिलेची अश्चिल वर्तन करुन त्यांचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार बाणेर येथे भर दिवसा घडला.
याबाबत एका ४२ वर्षाच्या महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी उबेर टॅक्सीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बाणेरमध्ये १ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेनऊ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांनी घरी जाण्यासाठी अॅपवरुन कॅब बुक केली. त्यानुसार कॅब आली. त्या टॅक्सीमध्ये बसल्या. त्यांनी चालकाला ओटीपी नंबर सांगितला. तेव्हा त्याने त्यांना ७०० रुपये भाडे सांगितले. त्यांनी टॅक्सीचालकाला विचारले, इथे तर ३५० रुपये दिसत आहे, तू जास्त पैसे कसे मागतो. यावर त्याने महिलेशी वाद घालण्यास सुरुवात केली. तेव्हा त्या टॅक्सीतून उतरुन पायी चालत जाऊ लागल्या. टॅक्सीचालकही त्यांच्या मागोमाग आला. त्यांच्याशी भर रस्त्यावर अश्लिल वर्तन करुन त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर तो पळून गेला. सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलीस हवालदार शिरसाठ तपास करीत आहेत.
