Pune Police News | दर आठवड्याला पोलीस आयुक्त अमितेशकुमार घेणार तळीरामांची शाळा ! रस्ता सुरक्षा अभियानात 40 टक्के अपघात कमी करण्याचा निर्धार

CP Amitesh Kumar

पुणे : Pune Police News | मद्यप्राशन करुन वाहन चालविणार्‍या तळीरामांची पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी पोलीस मुख्यालयात शाळा घेतली. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत खास सज्जड दम देऊन मद्य प्राशन करुन वाहन न चालविण्याबाबत कडक इशारा देखील दिला.

https://www.instagram.com/p/DUQJMcFCcXQ

प्रत्येक आठवड्याला पोलिस मुख्यालयात तळीरामांची शाळा पोलिसांकडून घेण्यात येणार आहे. त्यांना या समुपदेशन शिबीराला हजर राहावेच लागणार आहे. त्याच बरोबर रॅश ड्रायव्हींग, ट्रिपल सीट दुचाकी चालविणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे अशा वाहन चालकांवर कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांची वाहन जप्त करण्याच्या सुचना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत. जो पर्यंत त्यांचे या शिबीरात मनपरिवर्तन होत नाही तो पर्यंत त्यांची वाहने त्यांना परत देण्यात येणार नाहीत.

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत समुपदेशन व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्यासह वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मद्यप्राशन करुन वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या १ हजाराहून अधिक जण उपस्थित होते. कार्यक्रमांच्या सुरूवातीला राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, शहरात यापुढे कोणी मद्यप्राशन करून वाहन चालविणार नाही, अशी आमची भूमिका आहे. तुम्ही मद्यप्राशन करुन वाहन चालविल्याने अपघात घडतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर त्याचे परिणाम होतात याची कल्पना असावी. अशा वाहन चालकांना कायम लक्षात राहील अशी कारवाई पोलीस करतील. त्यांची वाहने तर जप्त करू, पण त्यांना त्यांचे मित्र, कुटुंबीय यांच्या देखत त्यांचा चौकात सत्कार करु, पोलिसांच्या संकेतस्थळावर देखील त्यांचे फोटो आम्ही प्रसिद्ध करु.

४० टक्के अपघात कमी करण्याचा निर्धार

या वर्षात ४० टक्के अपघात कमी करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु आहे. शहरातील अपघातांपैकी ३० टक्कांपेक्षा अधिक अपघात हे अवजड वाहनांमुळे होतात. त्यामुळे अशा अजवड वाहनांवर मध्यवस्तीमध्ये बंदी घातली असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. पुढील आठवड्यात अपघाताचे गुन्हे दाखल असलेल्या सर्व अवजड वाहनांवरील चालक आणि मालकांची देखील समुपदेशन शाळा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, शिक्षा देणे हा उद्देश नाही. परंतू तुम्ही वाहतूक नियमांचे पालन नाही केले तर त्याचे परिणाम गंभीर होतात. येथे जमलेले सर्व जण समुपदेशन कार्यक्रमानंतर समाजात मेसेंजर म्हणून काम करतील. यावेळी पोलीस आयुक्तांनी समोर बसलेल्या दोघांना मद्य प्राशन करुन का गाडी चालविली, असे विचारले असता त्यांनी चुक झाली, माफ करा, असे म्हणून आपला गुन्हा कबुल केला.

You may have missed