Pune Mayor Elections | राष्ट्रवादी काँग्रेस महापौर, उपमहापौर निवडणुकीत उमेदवार देणार नाही – ॲड. निलेश निकम (गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

Pune Mayor Elections | NCP will not field candidates in the Mayor, Deputy Mayor elections - Adv. Nilesh Nikam (Group Leader, NCP Party)

पुणे : Pune Mayor Elections | महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत उमेदवार देणार नाही. नुकतेच पक्षाचे सर्वोच्च नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. सभागृहात अजित दादांच्या विकासाच्या मुद्द्यावर भूमिका घेण्यात येणार असून ‘ पुणेकर ‘ प्रथम ही आमची भूमिका राहील. पुणेकरांच्या हिताच्या विरोधातील निर्णयाला कडाडून विरोध करण्यात येईल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते ॲड. निलेश निकम यांनी स्पष्ट केली.

पुणे महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी ९ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. आज यासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला शहर अध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, आमदार चेतन तुपे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आमचे नेते अजितदादा पवार यांचे नुकतेच दुर्दैवी निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर आणि उपमहापौर निवडणूक लढवायची नाही, असा एकमताने निर्णय झाला. हा निर्णय शहराच्या नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांना कळविला आहे.

सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रमुख विरोधकाची भूमिका समर्थपणे बजावेल. नेहमी विकासाचा ध्यास घेऊन राजकारण करणारे दिवंगत नेते अजित पवार यांच्या आदर्श समोर ठेवूनच ‘ पुणेकर ‘ प्रथम या तत्वानेच भूमिका पक्षाची राहील. पुणेकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा तितक्याच उच्च प्रतीचा राहील , याकडे सभागृहात आणि सभागृहाबाहेर देखील कटाक्षाने लक्ष देण्यात येईल.

You may have missed