Pune Mayor Elections | भाजपकडून महापौर पदासाठी मंजुषा नागपुरे तर उपमहापौर पदासाठी रिपाइं चे परशुराम वाडेकर यांचे अर्ज दाखल (Video)
पुणे : Pune Mayor Elections | महापालिकेच्या महापौरपदी भाजप ने सिंहगड रस्त्यावरील प्रभाग क्र. ३५ सनसिटी – माणिकबाग मधून बिनविरोध निवडून आलेल्या ज्येष्ठ नगरसेविका मंजुषा नागपुरे यांना तर रिपाइं चे परशुराम वाडेकर यांना उपमहापौर पदी उमेदवारी दिली. पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या दोघांचे अर्ज नगरसचिव कार्यालयात सुपूर्द करण्यात आले. १६५ सदस्य असलेल्या महापालिकेत भाजपचे ११९ नगरसेवक असल्याने या दोघांची निवड निश्चित मानली जात आहे.
भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत नागपुरे आणि वाडेकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली. यानंतर घाटे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, गटनेते गणेश बिडकर, माजी आमदार दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत या दोघांचे उमेदवारी अर्ज नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडे दाखल करण्यात आले. ९ फेब्रुवारीला या पदांसाठी निवडणूक होणार असून ती केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठीची प्रक्रिया रहाणार आहे.
भाजपकडून महापौर पदासाठी ज्येष्ठ नगरसेविका वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे, रंजना टिळेकर, मानसी देशपांडे यांच्या मध्ये स्पर्धा होती. अखेर भाजप पक्ष नेतृत्वाने नागपुरे यांना संधी दिली. तर रिपाइं च्या परशुराम वाडेकर यांची निवड खास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून झाली.
मंजुषा नागपुरे या सलग तिसऱ्यांदा महापालिकेत विजयी झाल्या आहेत. यावेळी त्या आणि त्यांच्या प्रभागातील सहकारी श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. नागपुरे या उच्च शिक्षित असून एम कॉम आहेत. नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी पहिली निवडणूक लढवली होती. त्यांनी संघटनेमध्ये आणि महापालिकेत विविध समित्यांवर काम केले असून महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव पाठीशी आहे.
परशुराम वाडेकर यांनी रिपाइं च्या विविध पदांवर काम केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्तीय असलेल्या वाडेकर यांच्या पत्नी सुनीता वाडेकर यांनी मागील मावळत्या सभागृहात उपमहापौर पद भूषविले आहे. प्रभाग क्रमांक ८ औंध – बोपोडीमधून ते विजयी झाले आहेत.
धीरज घाटे म्हणाले, भाजपला पुणेकरांनी घवघवीत यश दिले. पुणेकरांची सेवा करण्याची संधी दिली. कोअर कमिटी ने प्रदेश कार्यालयाला नावे पाठवली होती. सिंहगड रस्त्याच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे आणि परशुराम वाडेकर यांचे नाव निश्चित केले आहे.महापौर, उपमहापौर बिनविरोध व्हावी असा प्रयत्न.
गटनेते गणेश बिडकर म्हणाले महापालिकेतील भाजपची सत्ता
भाजपच्या तीन पिढ्यांनी केलेल्या कष्टाचे फळ आहे . जुन्या लोकांनी केलेल्या कष्टामुळे आज आपण सलग दुसऱ्यांदा बहुमताने सत्तेत आलो आहोत. पुणेकरांसाठी चांगले काम करण्यासाठी आपण बांधील आहोत.
