Pune Crime News | सोने कारागीराने मजुरी मागितल्यावर त्याला डांबून ठेवणार्‍या दुकान मालकाला फरासखाना पोलिसांनी केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  गेली ५ वर्षे काम करणार्‍या सोने कारागीराने २०२४ पासूनची जमा झालेली मजुरी व सोने मागितल्याने त्याला दुकानदाराने डांबुन ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. फरासखाना पोलिसांनी या दुकानमालकाला अटक केली आहे.

सुखदेव दास (वय ३८, रा. विटेकर बिल्डिंग, गणेश पेठ) असे अटक केलेल्या दुकान मालकाचे नाव आहे. याबाबत कारागीर अरिफ नासिम मंडळ (वय २७, रा. विटेकर बिल्डिंग, गणेश पेठ) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२१ पासून आतापर्यंत गणेश पेठेतील विटेकर बिल्डिंग येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरिफ मंडल हा गंठण बनविणारा कारागीर आहे. तो सुखदेव दास याच्याकडे २०२१ पासून काम करतो. २०२४ मध्ये फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ यांनी सुखदेव दास यांना खात्यावरील कामाचे सोने व पगार मागितला. तेव्हा दास याने उलट फिर्यादी व त्यांचा भाऊ या दोघांवरच २५५ ग्रॅम सोने कामाच्या सोन्यातून चोरल्याचा आरोप लावून त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या आईवडिलांना देखील धमकी दिली. त्यांच्याकडून पैसे घेतले. २०२४ पासून आजपर्यंत फिर्यादी यांच्या कामापोटी जमा झालेले अंदाजे २४० ग्रॅम सोने व ३ लाख ५० हजार  रुपये पगार दिला नाही. फिर्यादी व त्यांचा भाऊ यांच्याकडील मोबाईल काढून घेऊन त्यांना डांबुन ठेवले. अरिफ मंडल याच्याशी संपर्क होत नसल्याचे त्यांचे नातेवाईक त्यांना भेटायला आले. तेव्हा हा प्रकार समोर आला. फरासखाना पोलिसांनी सुखदेव दास यांना अटक केली आहे.

You may have missed