Pune Crime News | लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणाचे अपहरण करुन लुबाडणारी टोळी जेरबंद; गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या पथकाची कामगिरी, साडेसात लाखांचा माल जप्त

Pune Crime News | Gang that kidnapped and robbed a young man on the pretext of giving him a lift arrested; Crime Branch Unit 4 team's performance, goods worth seven and a half lakhs seized

पुणे : Pune Crime News |  पुणे स्टेशनला जाण्यासाठी शात्रीनगर चौकात थांबलेल्या तरुणाला लिफ्ट देण्याचा बहाणा करुन त्याचे चौघांनी अपहरण केले़ त्याला मारहाण करुन लुबाडणार्‍या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने अटक केली आहे.

राहुल किसन सावंत (वय १९, रा. समर्थनगर, खराडी, मुळ रा. आंबेजोगाई,  जि. बीड), निशांत झुंबर बागुल (वय २१, रा. चिखलठाण, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर), महेश रामकिशन सोनटक्के (वय २०, रा. खांदवेनगर, गीताई पार्क,लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून फिर्यादीचा चोरलेला मोबाईल, त्यांचे ३ मोबाईल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्विफ्ट डिझायर कार व लोखंडी कोयता असा एकूण ७ लाख ४१ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यांचा एक साथीदार फरार आहे.

याबाबत प्रेमजी पाटीदार (वय ४२, रा. नरपतगिरी चौक, सोमवार पेठ) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ३० जानेवारी रोजी रात्री दहा ते ३१ जानेवारी पहाटे अडीच वाजण्याच्या दरम्यान घडली होती.

येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात प्रेमजी पाटीदार  हे ३० जानेवारी रोजी रात्री दहा वाजता थांबले होते. त्यांना एका पांढर्‍या रंगाच्या डिझायर कारमधील चौघांनी लिफ्ट देतो, असे सांगून गाडीत घेतले. त्यांना बंडगार्डन परिसरात फिरवले. त्यांना मारहाण करुन मोबाईलवरील गुगल पेवरुन १८ हजार ८०० रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करुन घेऊन मोबाईल काढून घेतला. त्यांना कारमधून सोडून ते पळून गेले होते.

गुन्हे शाखेचे युनिट ४ चे पथक चंदननगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शास्त्रीनगर चौकात तरुणाला लुबाडणारे त्या गाडीसह खराडी येथील हॉटेल जत्रा येथे बसलेले आहेत. या माहितीची खात्री करुन पोलिसांनी तेथे जाऊन तिघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले.  पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर गुन्ह्याची कबुली दिली. तिघांना येरवडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहायक पोलीस फौजदार हरीश मोरे, एकनाथ जोशी, पोलीस अंमलदार प्रविण भालचीम, विठ्ठल वाव्हळ, नागेशसिंग कुंवर, शरद झांजरे, वैभव रणपिसे, विशल इथापे, रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे यांनी केली आहे.

You may have missed