Pune Mayor Elections | राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सातत्याने चार वेळा विजयी होउनही पक्षानेे संधी नाकारल्याने भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका वर्षा तापकीर नाराज

Pune Mayor Elections | Senior BJP corporator Varsha Tapkir upset as party denies her opportunity despite winning NCP's stronghold four times in a row

महापौर, उपमहापौर पदाचा अर्ज भरण्याकडे फिरविली पाठ

पुणे : Pune Mayor Elections | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बालेकिल्ल्यातून सलग चवथ्यांदा विजयी झालेल्या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका वर्षा तापकीर यांना महापौर पदाने हुलकावणी दिल्याने त्या नाराज झाल्या आहेत. त्यामुळे आज महापौर पदाचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी त्या अनुपस्थित राहील्याने भाजपमध्येही काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. भाजपने महापौर पदी मंजुषा नागपुरे यांनी संधी दिली आहे.

महापालिकेचे महापौरपद खुल्या महिला गटासाठी आरक्षित आहे. महापालिकेत सलग दुसर्‍यांदा बहुमताने सत्तेत आल्याने पक्ष आपल्याला संधी देईल अशी अपेक्षा तापकीर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना होती. वर्षा तापकीर या धनकवडी भागातून सलग चवथ्यांदा नगरसेविका झाल्या आहेत. सध्याच्या सभागृहामध्ये भाजपकडून तापकीर आणि कोंढव्यातील नगरसेविका रंजना टिळेकर या दोघीच वरिष्ठ सदस्य असून दोघींचीही नगरसेवक पदाची चवथी टर्म आहे. २०१७ मध्ये भाजपची महापालिकेत बहुमताने सत्ता आली त्यावेळी स्थायी समिती अध्यक्षपदी तापकीर यांची वर्णी लागेल अशी शक्यता होती. परंतू भाजपने त्यावेळी हेमंत रासने यांनाच सलग तीनवेळा अध्यक्षपदाची संधी दिली. यामुळे तापकीर नाराज झाल्या होत्या. पक्षाचे उपाध्यक्षपद देउन त्यांची नाराजी दूर करण्यात आली होती.

परंतू यंदा भाजपने तब्बल ११९ जागा मिळवून भरभक्कम यश प्राप्त केल्यानंतरही आणि महापौर महिलांसाठी आरक्षित झाल्यानंतर तापकीर यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा केवळ तापकीरच नव्हे तर संपुर्ण राजकिय वर्तुळात होती. मात्र, काल रात्री उशिरापर्यंत चर्चेत असलेले तापकीर यांचे नाव मागे पडून मंजुषा नागपुरे यांचे नाव आघाडीवर आले. त्यामुळे तापकीर या नाराज झाल्या. आज महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्यासाठी पक्षाचे नेते आणि सर्व नगरसेवक महापालिकेत आले होते. परंतू तापकीर यांनी याकडे पाठ फिरविली.

दरम्यान, नागपुरे या सिंहगड रस्त्यावरील सनसिटी माणिकबाग प्रभागातून प्रतिनिधीत्व करतात. हा प्रभाग निम्मा पर्वती आणि निम्मा खडकवासला विधानसभा मतदार संघामध्ये येतो. खडकवासला मतदार संघाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्या उमेदवारीला सिंहगड रस्त्यावरील भाजपच्या बहुतांश पदाधिकार्‍यांनी विरोध केला होता. यामध्ये मंजुषा नागपुरे यांचे पती दीपक नागपुरे यांचा देखिल समावेश होता. २०२९ मध्ये विधानसभा मतदार संघांची पुर्नरचना होणार आहे. नव्याने निर्माण होणार्‍या खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी मंजुषा नागपुरे या भाजपच्या संभाव्य उमेदवार असतील अशी चर्चा भाजपच्या आतापर्यंतच्या कार्यपद्धतीवरून सुरू झाली आहे. त्यामुळे अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेले विकास दांगट, सचिन दोडके यांच्यासह मूळ भाजपमधील इच्छुकांना नागपुरे यांच्या महापौर पदाच्या उमेदवारीमुळे आतापासूनच संभाव्य धोका निर्माण झाल्याची कुजबूज आजच सुरू झाली आहे.

You may have missed