Pune Crime News | कारखाना पोकलेनच्या सहाय्याने पाडून सर्व मशिनरी चोरुन नेल्याप्रकरणात ब्रम्हा कॉर्पचे करण अगरवाल, अजय अगरवाल, हिमांशु अगरवाल यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | A case has been registered against 8 people including Karan Agarwal, Ajay Agarwal, Himanshu Agarwal of Brahma Corp in the case of demolishing a factory with the help of Pokleen and stealing all the machinery

पुणे : Pune Crime News | वडगाव शेरी येथील गीताबाई चाळ ही जागा रात्री ११ वाजता ताब्यात घेताना ब्रम्हा कॉर्पने त्यातील कारखाना व गॅरेज पाडून कारखान्यातील ७० लाख ९० हजार रुपयांची मशिनरी चोरुन नेल्याप्रकरणी ब्रम्हा कॉर्पच्या संचालकांसह ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ब्रम्हा कॉर्प लि. चे करण अगरवाल, अजय अगरवाल, हिमांशु अगरवाल, श्रीनिवास रेड्डी, दत्ता चव्हाण, इसरार खान, संजय सिंग, रवी लुडकत व इतर कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजता घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपतराव गुलाबराव पासलकर (रा. इच्छापुर्ती सोसायटी,गणेशनगर, वडगाव शेरी) यांनी वडगाव शेरी येथील कारखाना पाडून जमीनदोस्त करुन कारखान्यामधील सर्व मशीनरी चोरीस गेल्याबाबत तक्रार अर्ज चंदननगर पोलीस ठाण्यात केला होता. त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे यांनी केला. गीताबाई चाळ येथे ग्रीन स्टार इंजिनिअरींग वर्क्स नावाचा कारखाना १९८० पासून सुरु होता. त्यांनी ही जागा दत्तु गलांडे यांच्याकडून भाड्याने घेतली होती. तेव्हापासून तेथे त्यांनी शीट मेटल्स प्रेस पार्ट, डाईज, जीग फिक्चर यांची कामे करण्याचा कारखाना चालु केला होता. कारखान्यात ७० लाख ९० हजार रुपयांची मशिनरी व कच्चा माल होता.

१५ ते २० जानेवारी २०२६ दरम्यान ब्रम्हा कॉर्प बिल्डरच्या लोकांनी पाडुन भुईसपाट करुन मशिनरी चोरुन नेली होती. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावर १५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता पोकलेन मशीन बाहेर येताना व ८ ते १० कामगार जागेला लोखंडी पत्र्यांचे कंपाऊंड करत असल्याचे दिसून आले.

मुमताज रियाज शेख (वय ६२,रा. कामराजनगर, येरवडा) यांचे येथे रियाज अ‍ॅटो वर्क्स नावाचे गॅरेज ३५ वर्षांपासून होते. १६ जानेवारी रोजी ब्रम्हा बिल्डर्सने ते तोडून गॅरेजमधील सर्व सामान बाहेर फेकून दिले होते. ते सामान त्यांचा मुलगा सुलतान शेख यांनी घरी घेऊन गेला होता.

या जागेचे मुळ मालक धनंजय दत्तात्रय गलांडे (वय ५०, रा. गीताबाई चाळ, सैनिकवाडी, वडगाव शेरी) यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की, त्यांची तेथे शेती होती. २०२४ मध्ये ब्राम्हा बिल्डर्स यांना आहे त्या परिस्थितीसह विक्री केली होती. या जागेमधील भाडेकरु त्यांना कोणताही मोबदला देत नव्हते. संपतराव पासलकर यांचा कारखाना होता. परंतु, तो मागील १० ते १२ वर्षांपासून बंद होता, अशी माहिती सांगितले.

पोलिसांनी ब्रम्हा बिल्डर्सच्या कार्यालयाशी संपर्क साधला. तेथील संजय दयानंद औसरमल (वय ४२, रा. रमाबाईनगर, पिंपरी) यांनी सांगितले की, गलांडे यांच्याकडून ब्रम्हा बिल्डर्स यांनी ही जागा १२ नोव्हेबर २०२५ रोजी विकत घेतली आहे. त्या ठिकाणच्या भाडेकरुंकडून परवानगी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व चौकशीवरुन गीताबाई चाळ येथील जागा ब्रम्हा कॉर्प लि. चे करण अगरवाल, अजय अगरवाल, हिमांशु अगरवाल यांनी या जागेमध्ये असलेले भाडेकरु सुशीला संपतराव पासलकर, मुमताज शेख हे आपला कारखाना व गॅरेज व्यवसाय करीत असताना त्यांच्या संमतीशिवाय, तसेच कोणत्याही न्यायालयाचे आदेशाशिवाय अगरवाल यांच्या सांगण्यावरुन श्रीनिवास रेड्डी, दत्ता चव्हाण, इसरार खान, संजयसिंग, रवी लुडकत व इतर कामगारांच्या मदतीने कारखाना व गॅरेज पाडून टाकले. कारखान्यातील ७० लाख ९० हजार रुपयांची मशिनरी व कच्या माल चोरुन नेला. जागेचा बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे तपास करीत आहेत.

You may have missed