Pune Crime News | शिवभक्त असल्याचा दावा करणार्या दोघांनी स्वराज्य पक्ष कार्यालयात घातला गोंधळ
पुणे : Pune Crime News | स्वराज्य पक्षाच्या कार्यालयात शिरुन शिवभक्त असल्याचा दावा करणार्या दोघा जणांनी पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांच्या फोटोला व कार्यालयामधील काचा दरवाज्यावर काळ्या रंगाचा बॉटल स्प्रे मारुन बदनामीकारक घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत श्रवण रामदास पाटील (वय २७, रा. भोसरी) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी योगेश खेंगरे व धनंजय रामचंद्र पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शिवाजीनगरमधील संचेती हॉस्पिटलसमोरील कुबेरा चेंबर्समधील स्वराज भवन येथील स्वराज्य पक्ष कार्यालयात ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश खेंगरे व धनंजय पवार यांनी आपल्या काही मागण्यांसह शिवस्मारकाविषयी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांच्याकडे निवेदन दिले होते. त्या मागण्यांचे काय झाले हे विचारण्यासाठी त्यांनी ३ फेब्रुवारी रोजी स्वराज्य पक्षाच्या कार्यालयात प्रवेश केला. मोठ्या आवाजात गोंधळ घातला. श्रवण पाटील यांनी त्यांना अटकाव केल्यावर त्यांनी पाटील यांना शिवीगाळ केली. बघुन घेण्याची धमकी दिली. पक्ष कार्यालयामधील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय राजाराम जाधव यांच्या फोटोला व कार्यालयामधील काचा, दरवाज्यांवर काळ्या रंगांचा बॉटल स्प्रे मारुन नुकसान केले. बदनामीकारक घोषणा दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर, पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, शिवाजीनगर पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत.
