Pune Crime News | शवविच्छेदनातून पतीचा बनाव झाला उघड; पत्नीच्या डोक्यात मारुन तिचा खुन करणार्या पतीस व रक्ताचे डाग पुसून पुरावा नष्ट करणार्या दोघा नातेवाईकांना अटक
पुणे : Pune Crime News | दारुच्या नशेत पत्नीच्या डोक्यात कठीण वस्तूने मारुन तिचा खुन करणार्या पतीस आणि घरातील रक्ताचे डाग पुसून पुरावा नष्ट करणार्या दोघा नातेवाईकांस खडक पोलिसांनी अटक केली आहे. रुग्णालयात उपचार घेणारी पत्नी पाय घसरुन पडल्याचा बनाव पतीने रचला होता. पण, शवविच्छेन करणार्या डॉक्टरांनी पाय घसरुन अशी डोक्याला जखम होऊ शकत नसल्याचे सांगितले आणि पतीचा बनाव उघड झाला.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती तुषार ऊर्फ गणेश विलास तुपसौंदर्य (वय २८, रा. हरकानगर, भवानी पेठ) त्याचे नातेवाईक मनोज रोहिदास कांबळे (वय ३९, रा. काशीवाडी, भवानी पेठ) आणि वनिता मनोज कांबळे (वय ३२, रा. गंजपेठ) यांना अटक केली आहे. वैष्णवी तुषार तुपसौंदर्य (वय २३, रा. गंज पेठ) असे मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयातून २ फेब्रुवारी रोजी महिलेचा मृत्यु झाल्याची माहिती खडक पोलिसांना देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे व त्यांचे सहकारी यांनी ससून रुग्णालयात जाऊन त्याचा पंचनामा केला. तेव्हा तुषार तुपसौंदर्य याने सांगितले की २८ जानेवारी रोजी वैष्णवी घरात पाय घसरुन पडल्याने तिच्या डोक्याला लागले होते. तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा २ फेब्रुवारी रोजी मृत्यु झाला. शवविच्छेदनात डोक्याला मार लागल्याने मृत्यु असा डॉक्टरांनी अहवाल दिला. अनिता तोंडे यांनी शवविच्छेदन करणार्या डॉक्टरांची भेट घेऊन विचारणा केली. वैष्णवी हिच्या डोक्याला, कानाजवळ, डोळ्याजवळ गंभीर जखमा झालेल्या होत्या. ही दुखापत पाय घसरुन पडून झालेली नसून टणक वस्तूने डोक्यात जबर मारहाणीमुळे झाल्याचे सांगितले.
पोलिसांनी तुपसौंदर्य यांच्या घराजवळील लोकांकडे प्राथमिक चौकशी केली. त्यात तुषार याने वैष्णवी हिला २८ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दारुच्या नशेत मारहाण केली. या मारहाणीत ती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडून होती. त्यावेळी तुषार हा तेथे बाहेर उभा राहून फोनवर जोरजोरात बोलून त्याने तिला मारुन टाकल्याचे सांगत होता. तेथील महिलांनी मुलांना बोलावून तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले.
तुषार याचे नातेवाईक मनोज कांबळे व त्याची पत्नी वनिता कांबळे यांनी मिळून घरामध्ये फरशीवर पडलेले वैष्णवी हिचे रक्त पुसून साफ करुन टाकले होते. स्थानिक महिलांनी ही माहिती पोलिसांना दिली. डॉक्टरांचा अभिप्राय आणि स्थानिक महिलांचे जबाब लक्षात घेऊन तुषार याने दारुच्या नशेत वैष्णवी हिच्या डोक्यात कठीण वस्तूने मारुन तिला गंभीर जखमी केले. उपचार सुरु असताना तिचा मृत्यु झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन तुषार तुपसौंदर्य याला अटक केली़ तसेच फरशीवर पडलेले रक्ताचे डाग पुसुन पुरावा नष्ट केल्याने मनोज व वनिता कांबळे यांनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार तपास करीत आहेत.
