Pune Lonavala News | लोणावळा : ड्रोन तंत्रज्ञान अन् ‘दुर्गा’ श्वानाच्या मदतीने 400 फूट खोल दरीतून शोधला विद्यार्थिनीचा मृतदेह
लोणावळा : Pune Lonavala News | दुर्गम भाग, खोल दरी आणि धुक्याचे वातावरण अशा आव्हानात्मक परिस्थितीत पुणे ग्रामीण पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत टायगर पॉईंटच्या दरीत पडलेल्या एलएलबी विद्यार्थिनीचा मृतदेह शोधून काढला आहे. या मोहिमेत ड्रोन तंत्रज्ञान आणि श्वान पथकाची कामगिरी मोलाची ठरली असून, यामुळे गुन्हे तपासाला नवी दिशा मिळाली आहे.
‘दुर्गा’ने दाखवला मार्ग, ड्रोनने शोधला मृतदेह
नवी मुंबईची २० वर्षीय विद्यार्थिनी श्रेया नरेंद्र पटी ३१ जानेवारीपासून बेपत्ता होती. ती टायगर पॉईंट परिसरातून दरीत पडल्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर शोधकार्य सुरू झाले. पुणे ग्रामीण दलाची श्वान ‘दुर्गा’ हिने श्रेया ज्या ठिकाणाहून दरीत पडली, तो अचूक मार्ग शोधून दिला. यामुळे ड्रोन नेमका कुठून उडवायचा, याचा अंदाज पोलिसांना आला.
पुणे ग्रामीण दलाचे ड्रोन हँडलर पोलीस अंमलदार संदीप जगताप यांनी तात्काळ ड्रोनच्या सहाय्याने २ किमी परिसरात सर्च ऑपरेशन राबवले. अवघ्या काही वेळातच ४०० फूट खोल दरीत श्रेयाचा मृतदेह पोलिसांना दिसून आला.
पोलिसांचे तांत्रिक कौशल्य
या यशस्वी मोहिमेबद्दल बोलताना ड्रोन हँडलर संदीप जगताप म्हणाले की, “आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर पुणे ग्रामीण पोलीस चांगल्या प्रकारे कौशल्याने करत आहेत. दुर्गम भागात जिथे माणूस पोहचू शकत नाही, तिथे ड्रोनच्या माध्यमातून आम्ही नजर ठेवू शकतो. यामुळे गुन्हे तपास वेगाने होण्यास आणि वेळ वाचवण्यास मोठी मदत होत आहे.”
शिवदुर्ग टीमचे धाडसी रेस्क्यू
मृतदेहाचे लोकेशन मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली शिवदुर्ग रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. टीमचे अनिल सुतार यांनी ४०० फूट दरीत उतरून मृतदेह बाहेर काढला. ३६ तासांच्या या थरारानंतर अखेर शोधमोहीम पूर्ण झाली.
सुरक्षेचा प्रश्न गंभीर
या घटनेने टायगर पॉईंटवरील मोडकळीस आलेल्या संरक्षक कठड्यांचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. अनेक पर्यटक फोटो काढण्यासाठी कडेला जातात, जे जीवघेणे ठरू शकते. येथे तातडीने कन्सेंटिंग जाळी लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई आरगडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
