Pune Crime News | तरुणावर कोयत्याने वार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचे कलमवाढ करुन चेतन चव्हाण याला केले जेरबंद

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | धनकवडीतील त्रिमुर्ती चौकाजवळ गजबजलेल्या रस्त्यावर मित्रावर वार केल्याच्या घटनेत भारती विद्यापीठ पोलिसांनी गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला होता. या मारहाणीचा व्हिडिओ बुधवारी दिवसभर व्हायरल झाला. कोयत्या गँगविषयी पुन्हा चर्चा सुरु झाली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचे गंभीर कलमवाढ करुन चेतन चव्हाण याला अटक केली आहे.

या घटनेत आदित्य सुनिल कांबळे (वय २०, रा. एस के रेसिडेन्सी, नवले पुलाजवळ, नर्‍हे) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी चेतन बाजीराव चव्हाण (वय २३, रा. समर्थ कॉम्प्लेक्स, धनकवडी) याला अटक केली आहे. ही घटना धनकवडीतील संजीवनी बार, त्रिमुर्ती चौक येथे तसेच तेथेच समोर असलेल्या ऊसाच्या गुर्‍हाळाच्या आतील गल्लीत २ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य कांबळे आणि चेतन चव्हाण हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. चेतन चव्हाण याच्यावर त्याच्या मैत्रिणीने विनयभंग केल्याची फिर्याद दिली आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात चेतन चव्हाण याच्यावर नोव्हेंबर २०२५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



आदित्य कांबळे आणि चेतन चव्हाण हे संजीवनी बारमध्ये दारू पिण्यास बसले होते. त्यावेळी चेतन याने आदित्यला तुझ्या सांगण्यावरुन मैत्रिणीने माझ्याशी मैत्री तोडून गुन्हा दाखल केला. त्यावेळी आदित्य याने मी तिला काही सांगितले नव्हते. थांब तिला फोन लावतो, असे म्हणून त्याने त्या मैत्रिणीला फोन लावून तो स्पिकरवर टाकला. फोन स्पिकरवर आहे, हे माहिती नसल्याने ती चेतन विषयी वाईटसाईट बोलली. ते ऐकून चेतनचा पारा आणखी वाढला. त्याने आदित्यला शिवीगाळ करुन त्याला  मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा घाबरुन आदित्य बारमधून बाहेर पडून धावू लागला. तेव्हा चेतन त्याचा पाठलाग करत होता. त्याने ऊसाच्या गुर्‍हाळातील कोयता घेऊन भर चौकात आदित्यला गाठले. तो खाली पडला असताना त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या आदित्य याला रुग्णालयात दाखल केले. भारती विद्यापीठ पोलिसांनी दुखापत केल्याचा गुन्हा दाखल केला. चेतन आदित्यवर कोयत्याने वार करत होता. तेव्हा जमलेल्या गदीर्तील लोकांनी त्याचा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ बुधवारी दिवसभर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न हे कलम वाढवून चेतन चव्हाण याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते तपास करीत आहेत.

You may have missed