Pune Bar Association Election | पुणे बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. काळुराम भुजबळ यांचा दणदणीत विजय; इतर पदांचेही निकाल जाहीर

Pune Bar Association Election | Adv. Kaluram Bhujbal wins resounding victory as Pune Bar Association President; Results of other posts also announced

पुणे : Pune Bar Association Election | शहरातील वकिलांची प्रमुख संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ॲड. काळुराम भुजबळ यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार ॲड. विशाल शिवले यांचा ५९७ मतांनी पराभव केला. ॲड. भुजबळ यांना एकूण ३,८०७ मते मिळाली.

शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील अशोका हॉलमध्ये बुधवारी मतदान आणि मतमोजणी पार पडली. गुरुवारी दुपारी निकाल जाहीर करण्यात आला. उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी झालेल्या तिरंगी लढतीत ॲड. कांताराम नप्ते (३,६१९ मते) आणि ॲड. प्रतापराव मोरे (२,७०६ मते) विजयी झाले. महिला राखीव गटातून ॲड. प्रितीसिंह परदेशी यांनी ३,०४७ मते मिळवत विजय संपादन केला.

सचिवपदी ॲड. सम्राट जांभुळकर (४,२७२ मते) आणि ॲड. अभिजीत पोळ (३,३४४ मते) विजयी झाले. महिला राखीव गटातून ॲड. पूजा पवार यांनी ३,८७६ मते मिळवली. खजिनदारपदी ॲड. अंजली बांदल यांनी ५,२७४ मते घेत स्पष्ट आघाडी घेतली. ऑडिटरपदी ॲड. शिवराज निंबाळकर (५,२९० मते) विजयी झाले, तर महिला गटातून ॲड. नेहा जांभळे यांनी ४,००४ मते मिळवली.

कार्यकारिणी सदस्यपदी सर्वसाधारण गटातून मयुर मराठे, विकास जाधव, उमेश मांजरे, प्रितेश दळवी, योगेश जैन, अनिल हुडे, अमोल वडगणे, उदय शेलार, प्रज्वल गुंजाळ आणि आकाश भिलारे यांची निवड झाली. महिला राखीव गटातून संध्या रायबोले, शितल देशमुख, गुंजन भोसले, स्मिता वाघमारे आणि प्रियंका घाडगे यांची यापूर्वीच सर्वानुमते निवड झाली होती.

यंदाच्या निवडणुकीत सुमारे ७,५०० मतदान झाले. खजिनदार आणि ऑडिटर पदाच्या उमेदवारांनी प्रत्येकी पाच हजारांहून अधिक मते मिळवत मोठे मताधिक्य नोंदवले.

You may have missed