Pune PMC News | शहरी गरीब आरोग्य योजनेला अजितदादा यांचे नाव द्यावे, उत्पन्नाची मर्यादा व निधी देखील वाढवावा; राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते ॲड. निलेश निकम यांची मागणी
पुणे : Pune PMC News | महापालिका आरोग्य विभागाच्या शहरी गरीब योजनेचे नाव ‘ अजितदादा पवार शहरी गरीब आरोग्य योजना ‘ असे करणे व निधीची तरतूद वाढविण्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चे गटनेते ॲड. निलेश निकम यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली.
पुणे महापालिकेच्या वतीने गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी २००९ पासून शहरी गरीब आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून आतापर्यंत हजारो नागरिकांवर आरोग्य उपचार झाले आहेत. आरोग्य सुविधा हे महापालिकेचे कर्तव्य असल्याने प्रशासनाने देखील ही योजना अव्याहतपणे सुरू ठेवून यशस्वी केली याबद्दल सर्वप्रथम आपला आभारी आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली, हे येथे आवर्जून नमूद करतो. अजितदादा पवार यांच्या स्मृती निमित्त या योजनेचे नाव ‘ अजितदादा पवार शहरी गरीब आरोग्य योजना ‘ असे करण्यात यावे. या योजने अंतर्गत सध्या आपण वार्षिक उत्पन्न एक लाख ६० हजार रुपये असलेल्या पुणेकरांना एक लाख रुपयांपर्यंत उपचारासाठी अर्थ सहाय्य करतो.
तसेच कॅन्सर रुग्णांसाठी ही मर्यादा दोन लाख रुपये आहे. उपचारांचे वाढते खर्च लक्षात घेता उत्पन्नाची मर्यादा तीन लाख रुपये असलेल्या पुणेकर नागरिकांना उपचारासाठी दोन लाख रुपयांपर्यंत अर्थ सहाय्य करावे, तसेच कॅन्सर पीडित रुग्णांना तीन लाख रुपये अर्थ सहाय्य करावे, ही विनंती. नागरिकांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून करणारे विकास पुरुष अजितदादा पवार यांना पुणेकरांच्या वतीने हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
आपल्याकडून सध्या २०२६- २७ या वर्षीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये वरील बदलांसह आवश्यक ती आर्थिक तरतूद करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते ॲड. निलेश निकम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.
यासंदर्भातील निवेदन आयुक्तांना देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे, ऍड. निकम, माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्यासह पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
