PMC Action On Illegal Construction In Pune | बेकायदा बांधकाम आणि व्यवसाय करणार्यांचे आता काही खरे नाही; बेकायदा बांधकाम आणि व्यवसायांबाबत महापालिका आयुक्तांची ‘एसओपी’ कामी आली
अवघ्या तीन दिवसांत ‘कनिष्ठ’ अभियंत्यांनी शोधली पन्नासहून अधिक बेकायदा बांधकामे
पुणे : PMC Action On Illegal Construction In Pune | महापालिका आयुक्तांनी शहरातील अनधिकृत बांधकामे आणि व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी नवीन ‘एसओपी’ जाहीर केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत क्षेत्रिय कार्यालयात नियुक्तीस असलेल्या ‘कनिष्ठ अभियंत्यांनी’ पन्नासहून अधिक अनधिकृतपणे कामे सुरू असलेली बांधकामे शोधून काढली आहेत. लोहगाव, खराडी परिसरासह गुजर निंबाळकरवाडीतील ही बांधकामे आहेत. शहराच्या उर्वरीत भागातील अहवालही प्रशासनाला प्राप्त होत असून शहरात मोठ्याप्रमाणावर बेकायदा बांधकामांचे पेव उघडकीस येण्याची शक्यता अधिकारी वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी २० जानेवारीला शहरातील अनधिकृत बांधकामे आणि व्यवसायांवर कारवाई संदर्भात संबधित विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेतली. अनधिकृत बांधकामांवर विहीत मुदतीत कारवाई करण्यासाठी एसओपी तयार केली. यामध्ये प्रामुख्याने क्षेत्रिय कार्यालयांमध्ये काम करणार्या कनिष्ठ अभियंत्यांवर त्यांच्या भागातील साईड व फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत बांधकामांसह सर्व प्रकारची अनधिकृत बांधकामे, पदपथांवरील अनधिकृत व्यवसाय यांचे दररोज सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपविली. त्यांनी याचा अहवाल क्षेत्रिय सहाय्यक आयुक्तांच्या मार्फत बांधकाम व अतिक्रमण निर्मुलन विभागाला पाठवायचा. या विभागांकडून संबधितांना नोटीस पाठवून पोलिस आणि व्हेईकल डेपोशी समन्वय साधून विहीत मुदतीत कारवाई करायची. याचा अहवाल बांधकाम व अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या माध्यमातून महापालिका आयुक्तांना पाठवायचा, असे या एसओपीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
अगदी चारच दिवसांपुर्वी आयुक्तांनी या एसओपीनुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले. अवघ्या तीनच दिवसांत खराडी, लोहगाव, नगररोड, कात्रज येथील गुजर निंबाळकरवाडी येथील कनिष्ठ अभियंत्यांच्या सर्व्हेत आढळलेल्या सुमारे पन्नास सुरू असलेली व यापुर्वी करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांची यादी संबधित क्षेत्रिय कार्यालये आणि विभागीय कार्यालयाकडून अतिक्रमण निर्मुलन कार्यालयाकडे पोहोचली आहेत. अवघ्या तीन दिवसांत दोन-तीन क्षेत्रिय कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्यांकडून साधारण पन्नास अनधिकृत बांधकामांचे फोटो, गुगल लोकेशन व जागा मालकांच्या नावासह तयार करून पाठविले आहेत. सर्वच क्षेत्रिय कार्यालयांकडून किमान महिनाभर प्रामाणिकपणे प्रयत्न झाल्यास याच बेकायदा बांधकामांची संख्या हजारोंमध्ये जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यासंदर्भात अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख सोमनाथ बनकर यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले दोन झोनल विभागांकडून अनधिकृत बांधकामांबाबतचे अहवाल प्राप्त झाले आहेत. बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात आयुक्तांनी कडक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दोन तीन दिवसांत बेकायदा बांधकामांवरील कारवाई तसेच व्यावसायीकांवरही कारवाई करण्यात येईल.
