Ajit Pawar Baramati By-Election | बारामती पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू; मतदारयादी पुनरीक्षणासाठी निवडणूक आयोगाची घोषणा
बारामती : Ajit Pawar Baramati By-Election | पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. मतदारसंघ रिक्त झाल्यानंतर निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करत, औपचारिक तयारीला सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे पोटनिवडणुकीची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाल्याचे स्पष्ट झाले असून, राज्याच्या राजकारणाचे लक्ष पुन्हा बारामतीकडे वळले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ही पोटनिवडणूक होणार आहे.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील कलम २१ अंतर्गत हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. मतदारयादी अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी आयोगाने निश्चित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ९ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती स्विकारल्या जातील. प्राप्त अर्जांची छाननी करून ६ मार्चपर्यंत त्यावर निर्णय घेतला जाईल आणि १० मार्च २०२६ रोजी अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात येणार आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पोटनिवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि बारामतीचे मतदार नोंदणी अधिकारी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती, आक्षेप-हरकतींची पद्धत आणि निवडणुकीसंबंधी आवश्यक समन्वय याबाबत चर्चा केली जाणार आहे. पारदर्शक आणि अचूक मतदारयादी तयार करण्यावर आयोगाचा भर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मतदार यादी पुनरीक्षणाच्या घोषणेमुळे बारामतीत राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, संभाव्य उमेदवार आणि पक्षीय रणनीती याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी पोटनिवडणूक राज्यातील सर्वाधिक चर्चेची लढत ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
