Pune Crime News | फटाका सायलेन्सर बसविणार्‍या दुचाकी वाहनांबरोबरच गॅरेज विरुद्ध वारजे पोलिसांनी केली कारवाई; 15 दुचाकी जप्त करुन सायलेन्सर केले नष्ट

Pune Crime News | Warje police take action against garages and two-wheelers installing firecracker silencers; 15 two-wheelers seized and silencers destroyed

पुणे : Pune Crime News |  फटाका सायलेन्सर बसवून लोकांना कानठळ्या बसविणारा आवाज करत जाणार्‍या दुचाकीस्वारांवर वारजे माळवाडी पोलिसांनी कारवाई केली आहे. अशा १५ बुलेट गाड्या जप्त करुन गॅरेज चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बुलेटला फाटका सायलेन्सर बसवुन त्याचा आवाज करत जाणार्‍या तरुणांबाबत अनेक तक्रारी येत होत्या. सोशल मीडियावरही त्याच्या या कृत्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. हे लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी अशा दुचाकीस्वारांवर कारवाईचे आदेश दिले. तपास पथकाने वारजे, कर्वेनगर, शिवणे भागात पेट्रोलिंग केले़ त्यादरम्यान मॉडिफाय केलेले व फटाके वाजविणारे सायलेन्सर लावून शांततेचा भंग करणार्‍या १५ बुलेट दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई केली. दुचाकीचे सायलेन्सर जप्त केले.

या दुचाकीस्वारांकडे केलेल्या चौकशीत हे मॉडिफाय केलेले सायलेन्सर वारजे येथील रॉयल बाईक सर्व्हिस या गॅरेजमधून बसविले असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांनी या गॅरेजमध्ये जाऊन चौकशी केली. गॅरेजचे मालक योगेश दामोदर सपकाळ (वय ३३, रा. ओप्युलन्स बिल्डिंग, झील  कॉलेज चौक, नर्‍हे) हा बुलेट मोटारसायकलला मॉडिफाय केलेले व फटाके वाजविणारे सायलेन्सर बसविताना मिळून आला. त्याच्याविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आर एम डी कॉलेजसमोर रोड रोलर जप्त केलेले मॉडिफाय सायलेन्सरवर चालवून त्यांचा चकनाचुर करण्यात आला. यावेळी असंख्य महाविद्यालयीन तरुणांना असे सायलेन्सर बसविल्यास काय कारवाई होते, हे दाखवून देत त्यांचे समुपदेशन करण्यात आले.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

You may have missed