Pune Rural Police | पुणे : ग्रामीण भागातही ‘आवाजाला’ मर्यादा; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास पोलिसांचा कारवाईचा इशारा

Sandeep Singh Gill

पुणे : Pune Rural Police | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी ध्वनीप्रदूषण आणि सुरक्षेबाबत कडक भूमिका घेतली आहे. ‘प्लाझ्मा साउंड’ आणि प्रखर लेझर झोतांवर बंदी घालण्यात आली असून, डेसिबल मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिला.

पुणे जिल्ह्यात सुमारे ५,३०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. गणेशोत्सवाचे नियोजन आणि कायदा-सुव्यवस्था याबाबत सूचना देण्यासाठी शनिवारी पाषाण रस्त्यावरील पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात जिल्ह्यातील प्रमुख १५० गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला विविध मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शुभम कुमार, गणेश बिरादार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय, महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही बैठकीत सहभागी झाले होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गिल म्हणाले की, गणेशोत्सवात ध्वनिक्षेपकांचा वापर करता येईल; मात्र निर्धारित डेसिबल मर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. मर्यादा ओलांडल्यास संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

गणेशोत्सवाच्या काळात ग्रामीण भागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

वर्गणीतून गावांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन

ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता असल्याकडेही पोलिसांनी लक्ष वेधले. गणेश मंडळांनी वर्गणीतून जमा झालेल्या निधीचा काही भाग गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी वापरावा, असे आवाहन करण्यात आले.

नसरापूर तसेच जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी परिसरात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंडळांच्या कार्यकर्त्यांनी अधिक सतर्क राहावे, असेही सांगण्यात आले. उत्सवकाळातील गर्दीवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवता येईल आणि गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होईल, असे पोलिसांनी नमूद केले.

You may have missed