Pune Crime News | पुणे : बहिणीशी बोलत नसल्याच्या रागातून सेवानिवृत्त सैनिकाने पत्नीचा गळा आवळून केला खुन; मुलाला समजल्यावर त्यालाही मारून टाकण्याचा प्रयत्न
पुणे : Pune Crime News | वडिलांच्या बहिणीशी बोलत नसल्याचा रागातून पतीने पत्नीचा गळा आवळून खुन केला. ही बाब मुलाला समजल्यावर त्यालाही मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सेवानिवृत्त सैनिकाने केल्याचे उघडकीस आले आहे.
दीपा महेंद्र दौंडकर (वय ४०, रा. संगम गार्डन, वाडा रोड, ता. खेड) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा अर्थव महेंद्र दौंडकर (वय १७) याने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी महेंद्र शिवाजी दौंडकर (Mahendra Shivaji Danudkar) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थव दौंडकर हा आई दीपा व वडिल महेंद्र दौंडकर यांच्यासह राहत होता. त्याचे वडिल २०१९ मध्ये आर्मीतून सेवानिवृत्त झाले असून ते सध्या विश्रांतवाडी येथील खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करतात. ते रहात असलेल्या सोसायटीमध्येच आजी सिंधुबाई किसन लोणकर, आजोबा किसन बाजीराव लोणकर व मामा केशव किशन लोणकर, मामी योगिता लोणकर हे राहतात. वडिलांची बहिण शोभा रोडे (रा. ऐरोली, ठाणे) व कल्पना चौधरी (रा. खारेगाव कळवा, मुंबई) या ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यांचे वर्तन हे आईशी चांगले नसल्या कारणाने आई त्यांच्याशी बोलत नव्हती. त्यांच्याशी न बोलण्याच्या कारणावरुन वडिल नेहमी त्यांच्याशी वाद घालत होते. या कारणावरुन २२ मार्च २०२६ रोजी वडिल घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेले होते. त्यानंतर ते परत आले.
३० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ वाजता अर्थव याने आईवडिलांसोबत जेवण केले. जेवण झाल्यावर आई घरात भांडी धुवत असताना वडिलही घरात बसलेले होते. अर्थव हा सोसायटीमधील तिसर्या मजल्यावरील मुलगा रुग्वेद पोखरकर याला भेटण्याकरीता गेला. तेथे गप्प मारत बसला असताना त्याची आई सुषमा पोखरकर यांच्या मोबाईलवर रात्री साडेअकरा वाजता अर्थवच्या आईचा मिस कॉल येऊन गेला. हे समजल्यावर तो घरी आला. वडिलांनी दरवाजा उघडला. तेव्हा त्यांनी अर्थव यांना आईला उठवु नकोस, ती गोळी खावुन झोपली आहे, असे सांगितले. अर्थव बेडरुममध्ये गेला असता बेडरुमची लाईट बंद होती. बेडवरील आईच्या अंगावर पांघरुन होते. त्याने तिच्याजवळ जाऊन तिला उठवत होता , परंतु,ती उठली नाही. म्हणून त्याने तिच्या अंगाला हात लावून पाहिले असता तिचे शरीर थंड जाणवले. म्हणून त्याने लाईट लावून पाहिले असता तिचे तोंड काळे निळे पडले होते. तिच्या मानेवर व्रण दिसले. तेवढ्यात त्याचे वडील बेडरुममध्ये आले. त्यांनी दरवाजाची कडी आतून लावून घेतली. त्यांनी अर्थवला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अर्थव याने त्यांना ढकलून बेडरुमचा दरवाजाची कडी उघडून जोरात आई बाबा, आई बाबा असे ओरडत तो बेडरुमच्या बाहेर हॉलमध्ये गेला. त्याचे वडिलांनी किचनमधील दोन चाकू हातामध्ये घेऊन अर्थवच्या अंगावर उगारुन जर तु आरडा ओरडा केलास तर तुला चाकुने खुपसेन, अशी धमकी देऊन पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न करु लागले.
अर्थव याने बचावाकरीता त्यांचा हात पकडु लागला. तेव्हा हातातील चाकूने अंगठ्यावर वार लागला. तेव्हा अर्थव याने घाबरुन आरडाओरडा करीत हॉलच्या दिशेने पळाला. हॉलच्या दरवाजाची कडी उघडली असता घराच्या बाहेर मामी, आजी, आजोबा, भाऊ, मावशी आले होते. त्यांनी वडिलांना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आजोबांना धक्का देऊन वडिल तेथील कठड्यावरुन उडी मारुन शेतात पळून गेले. अर्थव व इतरांनी दीपा दौंडकर यांना चांडोली सरकारी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून तिचा मृत्यु झाल्याचे सांगितले. महेंद्र दौंडकर पळून गेला असून खेड पोलीस तपास करीत आहेत.
