Pune Crime News | दारुच्या नशेत मुलाने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने वडिलांचा झाला मृत्यु; पर्वती पोलिसांनी दाखल केला खुनाचा गुन्हा

Pune Crime News | Drunk son pours petrol on father and sets him on fire; Parvati police files murder case

पुणे : Pune Crime News |  दोघे वडिल व मुलगा हे एकत्र सुतार काम करत. मुलाला दारुचे व्यसन होते. त्यातून झालेल्या भांडणात मुलाने आपल्या वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवुन दिले. उपचार सुरु असताना ३ दिवसांनी वडिलांचा मृत्यु झाला. पर्वती पोलिसांनी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

रवींद्र उद्धव भालेराव (वय ६१, रा. दांडेकर पुल, सिंहगड रोड) असे मृत्यु झालेल्या वडिलाचे नाव आहे. पोलिसांनी सागर रवींद्र भालेराव (वय २७, रा. दांडेकर पुल) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक इसराईल दगडु शेख यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र भालेराव व त्यांचा मुलगा सागर भालेराव हे दोघे सुतार काम करत असत. सागर याचा विवाह झाला असून त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. तो घरातील लोकांशी दारुच्या नशेत भांडण करुन नेहमी त्रास देत असतो. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दोघेही कामावरुन घरी आले. सागर याने दारुच्या नशेत वडिलांना शिवीगाळ केली. त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने मोटारसायकलच्या टाकीतून पेट्रोल काढून ते एका प्लॅस्टिकच्या बाटलीत भरले.

रवींद्र भालेराव हे खाली बसलेले असताना त्यांच्या अंगावर पेट्रोल फेकले व पेटवून दिले. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारच्यांनी धावत येऊन पाणी टाकून त्यांना वाचविले. त्यांची पत्नी विद्या व मुलगी दीपाली भालेराव यांनी तातडीने ससून रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी रवींद्र भालेराव हे ४५ टक्के भाजल्याचे सांगितले. त्यांच्या नातेवाईकांनी आता आम्ही तक्रार देणार नसल्याचे सांगितले. रवींद्र भालेराव यांच्यावर उपचार सुरु असताना ११ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पाऊण वाजता त्यांचा मृत्यु झाला.  पोलिसांनी स्वत: फिर्यादी होत सागर भालेराव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक महाले तपास करीत आहेत.

You may have missed