Pune Crime News | बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून पुणे विमानतळावर साडेपाच कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त
पुणे : Pune Crime News | बँकॉकहून आलेल्या प्रवाशाने खेळण्याच्या बॉक्समध्ये लपविलेला ५ कोटी ४२ लाख रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने जप्त केला आहे. या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानातून ११ फेब्रुवारी रोजी बँकॉकहून एक प्रवासी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्याने त्याच्याकडील सामानाची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्याच्याकडील खेळण्याच्या ५ बॉक्समध्ये पारदर्शक पाकिटांमध्ये कार्बन पेपरमध्ये हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. या अंमली पदार्थाचे वजन ५ किलो ४२९ ग्रॅम असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात ५ कोटी ४२ लाख रुपये एवढी किंमत आहे.
याबाबत आरोपी प्रवाशाला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत. अंमली पदार्थ कसा आणला व कोणाला देणार होता याबाबत माहिती दिली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या ड्रग्ज रॅकेटमागील इतर संबंधितांचा शोध घेतला जात असल्याची माहिती कस्टम विभागातर्फे देण्यात आली.
