Pune Crime News | आयएएस असल्याची बतावणी करुन सोसायटीचे चेअरमन बनुन तोतयाने 35 लाखांना घातला गंडा; बाणेर पोलिसांनी केली तोतयाला अटक

Pune Crime News | Pretending to be an IAS officer, he became the society chairman and tricked 35 lakh people; Baner police arrested the fraudster

पुणे : Pune Crime News |  आपण आय ए एस असल्याची बतावणी करुन बिल्डरकडून सोसायटी नावावर करुन घेऊन लोकांचा विश्वास संपादन केला. सोसायटीचा चेअरमन बनल्यावर सोसायटीतील रिकामे फ्लॅट मिळवुन देण्याच्या नावाखाली ३५ लाख रुपयांची फसवणूक केलेल्या तोतया आय ए एस अधिकार्‍याला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे.

हितेश प्रमोद कुलकर्णी Hitesh Pramod Kulkarni (वय २१, रा. इन्क्लुझिव्ह हाऊसिंग सोसायटी, बालेवाडी) असे या तोतयाचे नाव आहे. याबाबत सोसायटीचे खजिनदार दत्तात्रय वैजनाथ नागरगोजे (वय ३१, रा. ऋतुजा कॉम्प्लेक्स, सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना बालेवाडी हाय स्ट्रीट येथील इन्क्लुझिव्ह हाऊसिंग सोसायटीत जानेवारी २०२६ ते १५ नोव्हेबर २०२६ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश कुलकर्णी याने वडीलांना आपण लोकसेवा आयोगामध्ये आय ए एस झालो असल्याचे सांगितले. त्याच्या वडिलांनी ही बाब इतरांना सांगितली. त्यावरुन न्युज चॅनेल, वृत्तपत्रात त्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. लायन्स क्लबने त्याचा सत्कार केला. प्रत्यक्षात तो १२ वी पास आहे. दरम्यान, त्यांना इन्क्लुझिव्ह हाऊसिंग सोसायटीत म्हाडामार्फत फ्लॅट मिळाला. ते इथे राहायला आल्यावर त्याने सोसायटीतील सर्वांना आपण आय ए एस झालो असून वृत्तपत्रात व न्युज चॅनेलवर आलेल्या बातम्या दाखविल्या. त्याने पुढाकार घेऊन बिल्डरकडून कन्व्हेअस डिड करुन इमारत सोसायटीच्या नावे करुन दिली. त्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला. सोसायटीतील अनेकांनी येथील फ्लॅट भाड्याने देऊन ते दुसरीकडे राहतात. त्या सर्वांनी हितेश कुलकर्णी याला चेअरमन केले. सोसायटीतील अनेकांनी वनटाईम मेन्टेनन्स भरला होता. ती सर्व ३७ लाखांची रक्कम बँकेत जमा होती. चेअरमन झाल्यावर त्याने या मुदत ठेवीवर १० लाखांचे कर्ज घेतले. ५ लाख रुपये स्वत: वापरले. ३७ लाखांची मुदत ठेवी त्यामधून मिळालेले २७ लाख रुपये आणि सोसायटीच्या खात्यामधील शिल्लक ३ लाख रुपये असे एकूण ३० लाख रुपये स्वत:च्या फायद्यासाठी वापरले.

सोसायटीमधील काही फ्लॅट रिकामे आहेत. हे विक्री न झालेले फ्लॅट लोकांना लॉटरी लावुन देतो, असे सांगून लोकांकडून पैसे घेऊन त्यांना चॅटजीपीटी द्वारे बनावट पत्र तयार करुन दिले. सर्व सभासदांची एकूण ३५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन हितेश कुलकर्णी याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव तपास करीत आहेत.

You may have missed