Pune Crime News | घरफोडी करणार्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहून फिर्यादी म्हणाला अरे हा तर….; दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने आरोपीला पकडून 16 लाखांचा ऐवज केला हस्तगत
पुणे : Pune Crime News | कात्रज – कोंढवा रोडवरील गोकुळनगरमधील एका घराचे कडी कोयंडा उचकून चोरट्याने घरातील २४ लाख ४८ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. चोरी नेमकी कधी झाली, हे समजले नव्हते. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने मागील चार दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. संशयितांचे फुटेज फिर्यादीला दाखविले. त्यांच्यातील एकाला पाहिल्यावर ते म्हणाले, अरे हा तर माझ्या चांगल्या ओळखीचा आहे. या धाग्यावरुन पोलिसांनी आरोपीला पकडले.
कुमार रामचंद्र ठाकर Kumar Ramchandra Thacker (वय ३८, रा. अशोक अपार्टमेंट, दत्तनगर, आंबेगाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरु आहे.
याबाबत जिजाप्पा आजिनाथ देवकाते (वय ६५, रा. गल्ली नं. ३, विठ्ठल मंदिराजवळ, कात्रज कोंढवा रोड, गोकुळनगर) यांनी येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून चोरट्याने आत प्रवेश केला. बेडरुममधील कपाटाचे दार व आतील ड्रॉव्हर उचकटून कपाटातील सोन्याचे दागिने, चांदी व रोख रक्कम असा २४ लाख ४८ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. चोरीचा हा गुन्हा २ ते ६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडला होता.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने सीसीटीव्ही पथकाने या चार दिवसातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तिघा संशयितांना निष्पन्न केले. त्यातील कुमार ठाकर हा निष्पन्न झाला. पोलीस अंमलदार परेश सावंत व विनायक येवले यांना बातमीदारांकडून मिळालेली माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी शोध घेतल्यावर कात्रज येथील पीएमपी बस डेपो येथे कुमार ठाकर याला पकडण्यात आले. त्यांच्याकडून एकूण ११५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ८०० मिलीग्रॅमचे चांदीचे दागिने व ३५ हजार रुपये रोख असा १६ लाख ६५ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
कुमार ठाकर याला शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले होते. त्याच्यावर कर्ज झाले होते. त्याला जिजाप्पा देवकाते यांच्या घरी सोने, रोकड असल्याची माहिती होती. त्यातून त्याने दोघा साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याचे सांगितले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे, सहायक पोलीस निरीक्षक सी बी बेरड, पोलीस उपनिरीक्षक एस जे तानवडे, पोलीस अंमलदार कैलास चव्हाण, राजु पुणेकर, परेश सावंत, प्रफुल्ल मोरे, विनायक येवले, विक्रांत सासवडकर यांनी केली आहे.
