Pune Crime News | मिळकत कर विभागात एका नागरिकाने स्वत:च्याच डोक्याला ‘रिव्हॉल्वर’ लावून दिली धमकी; गर्दीच्यावेळी घडलेल्या प्रकाराने महापालिकेत खळबळ
संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल, शस्त्र परवानाही होणार रद्द; महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे आदेश
पुणे : Pune Crime News | मिळकत कराच्या थकबाकीबाबत वारंवार चकरा मारणार्या एका नागरिकाने प्रकरण लवकर मार्गी लावा अन्यथा इथेच डोक्यात मारून घेतो असे म्हणत थेट महापालिकेच्या कार्यालयातच डोक्याला रिव्हॉल्वर लावून घेतल्याने खळबळ उडाली. महापालिका आयुक्तांसह पोलिसांनीही याची गंभीर दखल घेतली आहे. संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याचा शस्त्र परवानाही रद्द करावा, असे आदेश पोलिस प्रशासनाला देण्यात आल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले, की महेश लोणकर नावाच्या एका व्यक्तिचे मंगल कार्यालय आहे. ते त्याने पाडून टाकले आहे. यानंतर मोकळ्या जागेचा कर लावण्यासाठी त्याने मिळकत कर विभागाकडे अर्ज केला होता. त्यानुसार प्रस्ताव तयार करून त्याला अतिरिक्त आयुक्तांनी मान्यता देखिल दिली होती. हे बील काढण्याची प्रक्रिया सुरू असताना आज लोणकर हे महापालिका भवनमधील बिल विभागात गेले होते. नवीन बिलाबाबत त्यांना संबधित महिला कर्मचारी माहिती देत असतानाच लोणकर यांनी कमरेचे पिस्तुल काढून डोक्याला लावत आता मी गोळी मारून घेउ का? असा संताप व्यक्त केला. यामुळे तेथे असलेले कर्मचारी घाबरले. तातडीने इतर अधिकार्यांना बोलावून घेण्यात आले. तिथे उपस्थित असलेल्यांनी त्यांना यापासून प्रवृत्त करत बाजूला नेले.
दरम्यान, हा प्रकार समजल्यानंतर महापालिका आयुक्तांनी याची गांभीर्याने दखल घेतली. आयुक्त राम यांनी सांगितले, की लोणकर यांच्या प्रस्तावाबाबत माहिती घेतली. या प्रस्तावात सर्वच अधिकारी स्तरावरून निगेटीव्ह अभिप्राय आले होते. परंतू यातून लवकर मार्ग काढू असे अधिकार्यांनी त्यांना सांगितले होते. परंतू त्यांनी संतप्त होउन डोक्याला रिव्हॉल्वर लावून घेतले. हे अत्यंत चुकीचे झाले. याप्रकरणी लोणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच त्यांचा शस्त्र परवाना देखिल जप्त करण्याबाबत पोलिसांना कळविणार आहे. महापालिका भवनमध्ये मागील काही काळात काही व्यक्ती थेट रिव्हॉल्वर सारखी शस्त्र घेउन येत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही गंभीरबाब आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आवारात घातक शस्त्र आणण्यास प्रतिबंध करण्यासाठी लवकरच कडक उपाययोजना करण्यात येतील.
