Pune Crime News | रेकॉर्डवरील अट्टल वाहनचोराला साथीदारासह गुन्हे शाखेच्या  युनिट 6 च्या पथकाने केले जेरबंद, वाहनचोरीचे 8 गुन्हे उघडकीस

Pune Crime News | A notorious vehicle thief with a record was arrested along with his accomplice by a team of Crime Branch Unit 6, 8 cases of vehicle theft were exposed

पुणे : Pune Crime News | रस्त्याने जाणार्‍यांना लुटणारे, वाहन चोरी करणार्‍या रेकॉर्डवरील वाहनचोराला गुन्हे शाखेच्या युनिट ८ च्या पथकाने साथीदारासह पकडले. त्यांच्याकडून ७ लाख रुपयांची ८ वाहने जप्त करुन ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पवन तानाजी माने (वय २२, रा. डी वाय पाटील रोड, पार्क व्हिस्टा, लोहगाव), प्रतिक शिवाजी अस्वरे (वय २०, रा. चिचगाव, ता. माढा, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
रिक्षाचालकाला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाईल आणि ५ हजार रुपयांची रोकड लुटल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी या दोघांना सप्टेंबर २०२५ मध्ये अटक केली होती. यातून जामिनावर सुटल्यावर ते पुन्हा वाहन चोरी करु लागले होते.

हडपसर येथील वाहनचोरीचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखेच्या युनिट ६चे पोलीस अंमलदार अमित कांबळे व तानाजी देशमुख यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, हडपसरमधील बापूराव तुकाराम तुपे चौक या ठिकाणी दोघे जण थांबले आहेत. त्यांच्याकडील मोटारसायकलला नंबर प्लेट नाही. त्यावरुन पोलिसांनी तेथे जाऊन त्या दोघांना व त्यांच्या बरोबर असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी ८ वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यात हडपसर पोलीस ठाण्यातील ६ आणि दिघी व चंदननगर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे ८ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून ७ लाख रुपयांच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, प्रशांत कर्णवर, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे व मनिषा लोखंडे यांनी केली आहे.

You may have missed