Pune Crime News | पीएमपी बस प्रवासात महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरणार्‍या दोघा सराईत गुन्हेगारांना सहकारनगर पोलिसांनी केली अटक

Pune Crime News | Sahakarnagar police arrest two criminals who stole gold bangles from a woman's hand during a PMP bus journey

पुणे : Pune Crime News | भोसरी बसस्टॉप ते बालाजीनगर दरम्यान पीएमपी बस प्रवासात महिलेच्या हातातील १ लाख रुपयांची सोन्याची बांगडी कट करुन चोरुन नेणार्‍या दोघा सराईत गुन्हेगारांना सिंधुदुर्ग कारागृहातून ताब्यात घेऊन अटक केली. सहकारनगर पोलिसांनी त्यांच्याकडून २ लाख रुपयांची सोन्याची बांगडी जप्त केली आहे.

गोविंद विठ्ठल गायकवाड (वय ३९, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) आणि वैभव शैलेश गायकवाड (वय २८, रा. केशवनगर, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोविंद गायकवाड याच्यावर ३ खुनाचा प्रयत्न, १ मारामारीचा आणि ९ चोरीचे असे एकूण १३ गुन्हे पुण्यातील मुंढवा व मालवण पोलीस ठाण्यात दाखल आहेत. वैभव गायकवाड याच्यावर १ खुनाचा प्रयत्न, १ जबरी चोरी, २ चोरी असे एकूण ४ गुन्हे मुंढवा व मालवण पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

याबाबत भोसरी येथील ५० वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी या लोअर इंदिरानगर येथील मैत्रिणीकडे ९ सप्टेंबर २०२५ रोजी येत होत्या. त्या दुपारी साडेतीन वाजता भोसरी बसस्टॉपवरुन बालाजीनगर येथे पीएमपी बसने आल्या. बालाजीनगर येथे उतरल्यानंतर त्यांना हातातील १७.५ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी दिसली नाही. सहकारनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस हवालदार अमोल पवार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ही चोरी गोविंद गायकवाड व त्याच्या साथीदारांनी केली आहे. आरोपींचा शोध घेत असताना तो मिळून येत नव्हता. आरोपीचा शोध घेत असताना गोविंद गायकवाड हा मालवण पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात ओरस कारागृहात असल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने ओरस कारागृहातून गोविंद गायकवाड व वैभव गायकवाड यांना ताब्यात घेऊन पुण्यात आणून अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा कबुल करुन गुन्ह्यातील २ लाख २ हजार रुपयांची सोन्याची बांगडी काढून दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे, सद्दाम हुसेन फकीर, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, बजरंग पवार, किरण कांबळे, सागर सुतकर, अभिमान बागलाने, महेश भगत, आकाश किर्तीकर, खंडु शिंदे, अमित पदमाळे, मारोती नलवाड, रफीक तडवी यांनी केली आहे.

You may have missed