Pune Crime News | जबरी चोरी करणार्या अल्पवयीन मुलाकडून 1 लाखांचे मोबाईल केले जप्त
पुणे : Pune Crime News | मुळा रोडवर येणार्या जाणार्यांना मोबाईल विकण्याचा प्रयत्न करत असलेल्या अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखेच्या युनिट ४ व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने पकडले़ जबरी चोरी करुन मिळविलेल्या १ लाख रुपयांचे मोबाईल त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.
गुन्हे शाखेचे युनिट ४ चे पथक व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक खडकी परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक जण मुळा रोडवर येणार्या जाणार्या लोकांना कमी किंमतीमध्ये चोरीचा मोबाईल विकत आहे. याबातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी मुळा रोडवर जाऊन या मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या वडिलांना बोलावून त्यांच्या समक्ष चौकशी केली. तेव्हा त्याने साथीदाराच्या सोबत मोटारसायकल वरुन तीन दिवसांपूर्वी हॉटेल कल्याणीजवळ रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पायी जाणार्या एकाचा मोबाईल हिसकावून घेतला होता. येरवडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हा १ लाख रुपयांचा मोबाईल जप्त केला आहे.
अधिक चौकशीत त्याने व त्याच्या साथीदाराने रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील पीएमपी बसस्टॉपजवळ उभ्या असलेल्या एकाचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याचे सांगितले. हा मोबाईल त्याच्या साथीदाराकडे असल्याचे सांगितले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.
या अल्पवयीन मुलाकडून येरवडा व शिवाजीनगर येथील मोबाईल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, डी जी बागवे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, पोलीस अंमलदार एकनाथ जोशी, प्रविण राजपूत, प्रविण भालचीम, विठ्ठल वाव्हळ, अमजद शेख, किशोर दुशिंग, सुभाष आव्हाड, शरद झांजरे, मयुरी नलावडे, रोहिणी पंढरकर, तसेच दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक छबु बेरड, पोलीस अंमलदार प्रफुल्ल मोरे, विनायक येवले यांनी केली आहे.
