Pune Crime News | दुघर्टना घडण्यापूर्वीच चोरीची घटना उघडकीस; नाहीतर अ‍ॅमनोरा टाऊनशीपमधील लोकांच्या जीवावर बेतण्याची होती शक्यता,काय आहे हा प्रकार वाचा सविस्तर

crime

पुणे : Pune Crime News | हडपसर येथील अ‍ॅमनोरा टाऊनशीपमधील ४ टॉवरमधील टेरेसमध्ये मोटार व कॉपर आर्मड वायर तेथील कामगारांनी चोरुन नेली होती. सुदैवाने चोरीची ही घटना वेळीच उघडकीस आली. यदा कदाचित या टॉवरमध्ये दुर्घटना घडली असती तर त्यामधील काही हजार लोकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अ‍ॅमेनोरा हाऊनशिपमधील अग्निशामक केंद्रातील असिस्टन्ट जनरल मॅनेजर जॉबी अब्राहम तोनिपारा (वय ४६, रा. अ‍ॅमनोरा पार्क टाऊनशिप हडपसर) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अल्ताफ शेख, जयपाल प्रकाश कांबळे आणि अमर निवंगुणे या कामगारावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी अ‍ॅमनोरा टाऊनशिपमधील टॉवर नं. ३१, ३२, ३३ आणि ३६ मधील टेरेसवरील जिना दाब नियंत्रण प्रणाली मशीन (मोटार) व कॉपर आर्मड वायर असा एकूण ३ लाख रुपयांचे सामान चोरुन नेले.

या चोरीच्या सामानाविषयी जॉबी तोनिपारा यांनी सांगितले की, अ‍ॅमनोरा टाऊनशिपमधील हे टॉवर प्रत्येकी २२ मजली आहेत़ या टॉवरमध्ये आग अथवा अन्य कोणतीही दुर्घटना घडली तर, इमारतीमधील लोकांना जिन्याने खाली येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ इमारतीमध्ये आग लागली तर त्याचा धुर जिन्यामध्ये येऊन खाली उतरणार्‍या लोकांना त्रास होऊ शकतो, ते टाळण्यासाठी जिन्यामध्ये दाब नियंत्रण प्रणाली लावण्यात आली आहे. त्यामुळे जिन्याने उतरणार्‍या लोकांना अशा आणीबाणीच्या वेळी श्वास घेण्यासाठी आवश्यक इतका हवेचा पुरवठा जिन्यांमध्ये खेळविला जातो. त्यासाठी या टॉवरमध्ये २० एचपीच्या मोटार व कापर्ड वायरीने ही प्रणाली लावण्यात आली आहे. मोटार व या वायरी चोरुन नेल्याने ऐनवेळी काही दुर्घटना घडली असती तर जिन्याने उतरणार्‍या लोकांना त्रास होऊ शकला असता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅमनोरा टाऊनशिपमध्ये मेन्टनस ऑफिसर दिग्वीजय सूर्यवंशी हे १२ फेब्रुवारी रोजी सकाळी तपासणी करीत असताना टॉवर नंबर ३२ वरील जिना दाब नियंत्रण प्रणाली मशीनचे नुकसान करुन त्यामधील तांब्याची वायर कोणीतरी काढून चोरी करुन घेऊन गेल्याचे लक्षात आले. त्यांनी फिर्यादी यांना ही गोष्ट कळविली. त्यांनी तेथे जाऊन पाहिल्यावर चोरी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरक्षा विभागाचे मॅनेजर जानराव अवसर मोरे यांनी सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये ११ फेब्रुवारी रोजी टॉवर ३२ मधील लिफ्ट ए व लिफ्ट सी मधील फुटेजमध्ये अ‍ॅमनोरा टाऊनशिपमधील काम करणारे कामगार अमर निवंगुणे, अल्ताफ शेख व जयपाल प्रकाश कांबळे हे दिसून येत आहे.

त्यामध्ये त्यांनी त्यांच्या कामाची वेळ संपल्यावर टॉवर क्रमांक ३२ मधील २२ मजल्यापर्यंत जाऊन जिना दाब नियंत्रण प्रणाली मशीनची तांब्याची वायर चोरी करुन नेल्याचे दिसत आहे. त्यामुळे फिर्यादी यांनी लगेच इतर बिल्डिंगवर असणारे जिना दाब नियंत्रण प्रणाली मशीन चेक करण्यास सांगितले. फायर बिग्रेड कर्मचारी यांनी जाऊन पाहणी केली असता टॉवर नंबर ३१, टॉवर नंबर ३३, टॉवर नंबर ३६ या बिल्डिंगवर असणारे जिना दाब नियंत्रण प्रणाली मशीनमधील मोटार व त्यास विद्युत पुरवठा करणारी १३१ मीटर वायर चोरीस गेल्याचे दिसून आले. २ लाख ४० हजार रुपयांच्या ४ मोटारी आणि ६० हजार रुपयांची १३१ मीटर कॉपर आर्मड वायर असा ३ लाख रुपयांचा माल चोरुन नेला होता. वेळेवर ही चोरी लक्षात आली असून हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी तपास करीत आहेत.

You may have missed