Pune Crime News | अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या नराधमाला वारजे माळवाडी पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | अल्पवयीन मुलीला ओळखीचा फायदा घेऊन शाळेत सोडतो, असे सांगून तिला कारमध्ये बसवून तिचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या नराधमाला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
ज्ञानेश्वर सुरेश रायरीकर Dnyaneshwar Suresh Rayrikar (वय २९, रा. पोळ कॉलनी, आपटे सोसायटी रोड, वारजे माळवाडी) असे या नराधमाचे नाव आहे. न्यायालयाने त्याला २ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
याबाबत १३ वर्षाच्या मुलीच्या आईने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी ते ७ वाजून २० मिनिटांनी कर्वेनगर येथील दुधाणे लॉन्सजवळील डी पी रोडवर घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित मुलीची ज्ञानेश्वर रायरीकर याच्याशी ओळख होती. ही मुलगी शाळेत जाण्यासाठी घराजवळ थांबलेली असताना ज्ञानेश्वर रायरीकर हा कार घेऊन आला. मी तुला शाळेत सोडतो, असे सांगून तिला कारमध्ये बसविले. शाळेत सोडण्याऐवजी कर्वेनगरमधील दुधाणे लॉन्सजवळील डी रोड येथील कच्च्या रोडवर कार थांबविली. कारमध्ये तिच्यावर बळजबरीने शरीर संबंध केले. त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला बघुन घेतो, अशी धमकी दिली.
या घटनेने ही मुलगी घाबरुन गेली होती. रात्री उशिरा तिने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर वारजे माळवाडी पोलिसांनी १९ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता गुन्हा दाखल करुन ज्ञानेश्वर रायरीकर याचा शोध घेऊन त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे तपास करीत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी सांगितले की, वारजे पोलिसांनी या आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. ज्ञानेश्वर रायरीकर हा ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याने सेकंड हँड कार विकत घेतली आहे. गुन्ह्यात वापरलेली ही कार पोलिसांनी जप्त केली आहे. ज्ञानेश्वर रायरीकर याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
