Pune Crime News | गुंतवणुकदारांची फसवणूक करुन 3 वर्ष फरार झालेल्या संचालकाला चंदननगर पोलिसांनी केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ९० गुंतवणुकदारांची ३ कोटी ३९ लाख १२ हजार ६३७ रुपयांची फसवणुक करुन गेली ३ वर्षे फरार झालेल्या कंपनी संचालकाला चंदननगर पोलिसांनी नाशिकमधून जेरबंद केले आहे.
भारत सोपान पठारे Bharat Sopan Pathare (वय ३०, रा. नाऊरगाव ता़ श्रीरामपूर, जि अहिल्यानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात २०२३ मध्ये ठेवीदार हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारत पठारे याने एफ ट्रेड सेल्स एजन्सी प्रा. लि. या कंपनीचे मुंबईतील बोरीवली व खराडी येथे कार्यालय थाटले होते. गुंतवणुकदारांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांना आपल्या कंपनीत गुंतवणुक करण्यास भाग पाडले. भारत पठारे याने प्रथम थोड्या प्रमाणात परतावा देऊन लोकांचा विश्वास संपादन केला. ९० गुंतवणुकदारांनी ३ कोटी ३३९ लाख १२ हजार ६३७ रुपयांची गुंतवणुक केली. सप्टेबर २०२१ ते ३१ ऑक्टोंबर २०२३ दरम्यान लोकांनी ही गुंतवणुक केली. त्यानंतर भारत पठारे हा कार्यालये बंद करुन फरार झाला होता. चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी त्याची पत्नी व कंपनीतील एकाला त्या वेळी अटक केली होती. परंतु, भारत पठारे हा सापडत नव्हता.
भारत पठारे हा नाशिक भागात असल्याची बातमी चंदननगर पोलिसांना मिळाली. त्यावरुन स्थानिक पोलिसांच्या मदतीने पठारे याला नाशिकमधील पाथर्डी फाटा येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख, सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळवे, पोलीस हवालदार गुरव, घावटे, घाडगे, पोलीस अंमलदार बेंद्रे यांनी केली आहे.
