Pune Traffic Police Action | स्वारगेट परिसरात दोन दिवस बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा; वाहतूक पोलिसांकडून 375 रिक्षाचालकांवर कारवाई
पुणे : Pune Traffic Police Action | स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौकात ३७५ बेशिस्त रिक्षाचालकांवर दोन दिवसात वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाई केली. पोलिसांनी रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत तांत्रिकदृष्ट्या व्यवसाय करण्यास अपात्र असलेल्या १० रिक्षा जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे स्वारगेट चौकातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. बेशिस्तपणे स्वारगेट एसटी स्थानकातील प्रवेशद्वाराच्या परिसरात रिक्षा लावण्यात आल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत होऊन कोंडी व्हायची.
स्वारगेट परिसर अहोरात्र गजबजलेला असतो. या भागात एसटी बस थांबा, पीएमपी, तसेच मेट्रो स्थानक आहे. प्रवाशांची वर्दळ असलेल्या स्वारगेट चौकात बेशिस्तपणे रिक्षाचालक व्यवसाय करायचे. एसटी, पीएमपी स्थानकाच्या परिसरात रिक्षा लावण्यात येत असल्याने वाहतूक विस्कळीत व्हायची. वाहतूक कोंडीतून वाट काढत प्रवाशांना या भागातून जावे लागायचे. बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध तक्रारी करण्यात आल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक शोभा क्षीरसागर आणि पथकाने या परिसरातील जेधे चौक, स्वारगेट बस स्टँड इन व आऊट गेट, स्वारगेट महामेट्रोसमोर बेशिस्त रिक्षा चालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविली.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक, भाडे नाकारणे, तसेच व्यवसायास अपात्र असलेल्या रिक्षा, वाहतूकीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पोलिसांनी तीन दिवसांत ३७५ रिक्षा चालकांवर कारवाई केली, अशी माहिती वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक शोभा क्षीरसागर यांनी दिली.
स्वारगेट परिसरात नियमित कारवाई
स्वारगेट परिसरात यापुढील काळात नियमित कारवाई करण्यात येणार आहे. पीएमपी बसला स्वारगेट चौकात वळताना अडथळा होत होता. सिग्नल तोडण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी व्हाययची. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, तसेच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी यापुढे नियमित कारवाई करण्यात येणार आहे. रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.
जादा प्रवासी वाहतूक – २०३
भाडे नाकारणे – ५३
युनिफॉर्म नसणे – ४८
वाहतूकीस अडथळा – १८
फॉल्टी रिक्षा जमा – १०
सध्याच्या परिस्थितीत गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी एमएनजीएलने सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
