Pune Crime News | पाण्याची टाकी अंगावर पडून तरुणाचा मृत्यु; पॅथोलॉजी लॅबोरेटरीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | पॅथोलॉजी लॅबोरेटरीच्या वॉटर प्युरिफायर मशीनचे काम करत असताना नुकत्याच बसविलेल्या पाण्याच्या टाकीचा लोखंडी अँगल तुटून टाकी अंगावर पडल्याने त्यात २१ वर्षाच्या तरुणाचा मृत्यु झाला. याप्रकरणी पॅथोलॉजी लॅबोरेटरीच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राहुल सीमा सतनामी (वय २१, रा. रायकर मळा, धायरी) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांची आई सीमा श्रीकांत सतनामी (वय ४४) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी स्वप्निल सुभाष देवडे Swapnil Subhash Devde (वय ४३, रा. बकवालनगर, नायगाव, मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एरंडवणा येथील गुलमोहर सोसायटीच्या तळमजल्यावरील हेल्थकेअर सायन्सेस या लॅबमध्ये २० फेब्रुवारी रोजी दुपारी घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेल्थकेअर सायन्सेस या पॅथॉलॉजी लॅबोरेटरी व्यवस्थापक स्वप्नील देवडे यांनी महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता निष्काळजीपणे घटनेच्या २ दिवस अगोदर पाण्याची टाकी बसविली होती. व्यवस्थापकाने राहुल सतनामी यांच्याकडून वॉटरप्युरीफायरचे काम करुन घेतले होते. यावेळी शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीचा अँगल तुटून ती टाकी राहुल सतनामी याच्या अंगावर पडली. त्यात त्याचा मृत्यु झाला होता. डेक्कन पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती. त्यात तपास केल्यानंतर व्यवस्थापकांनी निष्काळजीपणे पाण्याची टाकी बसविल्याने ती पडून राहुल सतनामी याचा मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले तपास करीत आहेत.
