Pune Crime News | चारित्र्याचा संशयावरुन केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यु; पानटपरीचालक पतीला बिबवेवाडी पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | चारित्र्याचा संशय घेऊन पतीने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचा उपचार सुरु असताना गुरुवारी पहाटे मृत्यु झाला. बिबवेवाडी पोलिसांनी पानटपरी चालक पतीला अटक केली आहे.
सारीका शुभम घोडके (वय २३) असे मृत्यु पावलेल्या विवाहितेचे नाव आहे. शुभम श्रीकांत घोडके Shubham Srikanth Ghodke (वय २९, रा. अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याला अटक केली आहे.
सारीका हिची आई गेणीबाई रुपसिंग चव्हाण (वय ५०, रा. अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरात २४ मार्च राजी दुपारी ४ वाजता घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम घोडके याची पान टपरी आहे. सारीका ही गृहिणी होती. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. शुभम हा तिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे. तो २४ मार्च रोजी दुपारी तो घरी आला. त्याने सारीकाच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिच्या डोक्यात, हातावर, पायावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन तिला गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सारीका हिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. बिबवेवाडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बुधवारी रात्री दाखल करुन शुभम घोडके याला अटक केली. उपचार सुरु असताना गुरुवारी पहाटे सारीका हिचा मृत्यु झाला. बिबवेवाडी पोलिसांनी खुनाचे कलम वाढविले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करीत आहेत.
