Ashok Kharat  | ‘महिलांसोबतचे कृत्य हा विधीचाच भाग’; आरोपी अशोक खरातचा पोलीस तपासात अजब दावा

Ashok Kharat | 'Actions with women are part of the ritual'; Accused Ashok Kharat's strange claim in police investigation

नाशिक :  Ashok Kharat  | नाशिक जिल्ह्यातून एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, स्वतःला अध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाने तपासादरम्यान धक्कादायक खुलासे केले आहेत. पीडित महिलांसोबत त्याने केलेली अघोरी आणि अश्लील कृत्ये हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसून, तो केवळ आपल्या विशिष्ट ‘विधी’चा एक भाग असल्याचा दावा त्याने पोलिसांसमोर केला आहे. त्याच्या या अजब दाव्यामुळे पोलीस तपासात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, अशोक खरात याने नाशिकमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले होते. अनेक महिला आपल्या घरगुती समस्या, आजारपण किंवा मानसिक त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी त्याच्याकडे येत असत. या महिलांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन खरात त्यांना विधीच्या नावाखाली निर्जन स्थळी किंवा गुप्त ठिकाणी बोलावून घेत असे. तिथे तो त्यांच्यावर अघोरी उपचार करत असल्याचे भासवून लैंगिक अत्याचार आणि विनयभंग करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि खरातला ताब्यात घेतले, तेव्हा त्याने आपल्या कृत्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. “मी जे काही केले, ते त्या महिलांच्या फायद्यासाठी आणि त्यांच्या अंगातील पीडा दूर करण्यासाठी केलेल्या विधीचा भाग होता,” असे त्याने चौकशीत सांगितले. मात्र, पोलिसांनी त्याचे हे सर्व दावे फेटाळून लावले असून, हा निव्वळ अंधश्रद्धेचा आधार घेऊन महिलांची फसवणूक आणि शोषण करण्याचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पोलिसांनी अशोक खरातवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात आणखी किती महिलांची फसवणूक झाली आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, अशा भोंदूगिरीला बळी न पडण्याचे आणि तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन नाशिक पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

You may have missed