Advt M.B. Waghmare | आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते ऍड. एम. बी. वाघमारे यांचे निधन
पुणे : Advt M.B. Waghmare | आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, मुळशी पंचायत समितीचे माजी सदस्य आणि संत तुकाराम साखर कारखान्याचे माजी संचालक ऍड. मधुकर बळवंत उर्फ एम. बी. वाघमारे (वय ८९) यांचे अल्पश: आजाराने गुरुवारी पहाटेच्या सुमारास पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते पुणे महापालिकेचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
मुळशी तालुक्यातील वाकड गावचे सुपुत्र असलेले ऍड. मधुकर वाघमारे यांनी १९६३ मध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील भूमीहिनांच्या चळवळीत सहभाग घेतला तसेच अनेक वर्ष आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व करून महाराष्ट्रातील गोरगरीब, कष्टकरी, दलित, श्रमिक, झोपडपट्टी वासियांसाठी भरीव काम केले.
आपल्या सामाजिक व राजकीय जीवनात त्यांनी मुळशी तालुका पंचायत समितीचे सदस्य, संत तुकाराम साखर कारखान्यावर संचालक आणि डॉ. आंबेडकर सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम केले.
पौड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा साकारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ते पुतळा उभारण्याच्या समितीचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी पुणे शहर, पिपंरी चिंचवड आणि जिल्ह्यातील बुद्ध विहारांच्या जडणघडणीत उल्लेखनीय व मोलाचे योगदान दिले. या कार्याची दखल घेऊन त्यांना सामाजिक न्याय विभागाने समाजभूषण पुरस्काराने गौरवले होते.
भाऊसाहेब वाघमारे यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर दुपारी औंध येथील स्मशानभूनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार ऍड. जयदेवराव गायकवाड, पुणे महापालिकेचे माजी आयुक्त रत्नाकर गायकवाड, उपमहापौर परशुराम वाडेकर, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनिता वाडेकर, माजी पोलिस अधिकारी चंद्रशेखकर दैठणकर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर, नगरसेवक ऍड. अविनाश साळवे, राजाभाऊ बराटे, निलेश आल्हाट, भंते नागघोष, लोकमतचे संपादक संजय आवटे, माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, विरेद्र कराड, अविनाश बागवे, सुशील मेंगडे, ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत साळवे अशोक धिवरे, एम टी कांबळे असित गांगुर्डे, विलास वनशिव, राहूल डबाळे, महिपाल वाघमारे, किरण आल्हाट, संगीता आठवले, निवेदक दीपक म्हस्के, सुखदेव तात्या सोनवणे डॉ. राजेश थोरात संजय बनसोडे, रवींद्र चव्हाण, दिलीप कुसाळे, शेखर जावळे, डॉ.पवन साळवे. अनिल सूर्यवंशी, शरद जाधव, रवींद्र दुधेकर, रोहिदास गायकवाड, प्रमोद निरभवणे, दीपक हूबरे आदींसह आंबेडकरी चळवळीतील विविध कार्यकर्ते, समाजाच्या विविध घटकातील मान्यवर व महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
