Ashok Kharat | ‘ऑपरेशन अशोक खरात’! राज्यातील फक्त 5 लोकांनाच माहित होतं टॉप सिक्रेट, अशी केली कारवाई
नाशिक : Ashok Kharat | नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि महिलांच्या शोषणाचे आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांनी राबवलेले ‘ऑपरेशन अशोक खरात’ अतिशय थरारक आणि गोपनीय होते. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या मोहिमेचे अत्यंत सूक्ष्म नियोजन केले होते, ज्याची माहिती केवळ राज्यातील ५ जणांनाच होती.
खरात हा राजकीयदृष्ट्या वजनदार आणि प्रभावशाली व्यक्ती असल्याने, अटकेची बातमी फुटल्यास तो फरार होण्याची किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्याची शक्यता होती, त्यामुळे ही कमालीची गुप्तता पाळण्यात आली. या कारवाईसाठी पोलिसांनी साध्या वेशात आणि खासगी गाड्यांचा वापर करून खरातच्या घरावर आणि आश्रमावर पाळत ठेवली होती. जेव्हा खात्री पटली की तो जाळ्यात अडकू शकतो, तेव्हाच रात्रीच्या वेळी अचानक छापा टाकून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.
याबाबत कारवाईची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक सदानंद दाते, नाशिक पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि नाशिक पोलीस दलातील आणखी एक कर्मचारी यांनाच फक्त याविषयी माहिती होती, असे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.
या कारवाईत पोलिसांनी कोणतेही तांत्रिक पुरावे किंवा मोबाईल लोकेशन्स लीक होऊ दिले नाहीत, जेणेकरून खरातला सावध होण्याची संधीच मिळणार नाही. पोलीस आयुक्तांच्या या धाडसी आणि नियोजनबद्ध भूमिकेमुळे एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणातील ‘टॉप सीक्रेट’ मोहिमेची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे.
