Pune Crime News | अॅपल कंपनीचा अधिकृत डिलर असल्याचे भासवुन वितरकाला साडेपाच कोटी रुपयांना गंडा घालणार्या तिघांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | अॅपल कंपनीचे इन्ग्राम कोड असल्याचे भासवुन अॅपल कंपनीचे मोबाईल विक्रीसाठी देण्यासाठी ऑर्डर व पैसे घेऊन माल न देता एका वितरकाला तब्बल ५ कोटी ५२ लाख ८२ हजार ५६२ रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत निखिल अरुण सर्गे (वय ४२, रा. विशालनगर, पिंपळे निलख) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सर्फ कम्युनिकेशनचे संचालक रफि सईत, शाबीर सईत आणि टि व्ही कॉर्प सोल्युशनचे संचालक विवनाथ मुरुगप्पन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजीनगर येथील व्हेरॉनिक्स ग्लोबल या कंपनीत एप्रिल २०२४ ते आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅपल या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या मालाचा पुरवठा करण्यासाठी इन्ग्राम कोड असावा लागतो. त्याशिवाय कंपनीच्या मालाचा पुरवठा करता येत नाही. फिर्यादी निखिल सर्गे हे वितरक असून त्यांचा मोबाईल विक्रीचे दुकान आहे. सर्फ कम्युनिकेशनच्या संचालक रफी सईत व शाबीर सईत आणि टी व्ही कॉर्प प्रा़ लि़ या कंपनीचे संचालक विश्वनाथ मुरुगप्पन यांनी आम्ही अॅपल कंपनीचे वितरक असून आमच्याकडे मालाचा पुरवठा करायचा इन्ग्राम कोड आहे, असे भासवले. फिर्यादी यांच्याकडून पर्चेस ऑर्डर घेतली. सुरुवातीला त्यांना दुसर्यांकडून माल घेऊन अॅपल कंपनीचे मोबाईल व इतर उपकरणांचा पुरवठा केला.
त्यानंतर त्यांच्याकडून काही कोटी रुपये घेतले. त्यापैकी काहींचा माल पुरविला. साडेपाच कोटी रुपयांचा माल पुरवला नाही. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर या कंपनीकडे इन्ग्राम कोड नसल्याची फिर्यादी यांना माहिती मिळाली. त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांनी पैसे देण्याचे खोटे आश्वासन दिले. त्यांनी लेटरहेटवर साधा समजुतीचा करारनामा तयार करुन त्यावर फिर्यादी यांना जबरदस्तीने सही करण्यास लावले. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी पोस्टडेटेड चेक दिले. वेळोवेळी वेगवेगळी कारणे देऊन ते चेक वठविण्यास मनाई करुन फिर्यादी यांनी दिलेल्या साडेपाच कोटी रुपयांचा अपहार केला. सहायक पोलीस निरीक्षक पाडोळे तपास करीत आहेत.
